Home /News /entertainment /

मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का! ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन कालवश

मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का! ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन कालवश

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (Ravi Patwardhan) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते.

    मुंबई, 06 डिसेंबर: यावर्षी 2020 सालामध्ये मनोरंजन विश्वाने अनेक कलाकार गमावले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी आज सकाळी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (Ravi Patwardhan) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 5 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. मराठी नाटक-चित्रपटांसह अनेक मालिकाही त्यांनी गाजवल्या आहेत. अलीकडेच ते 'अग्गबाई सासूबाई..' या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारात होते.  अनेक नाटकांत आणि चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय आहेत. 1974 मध्ये त्यांनी रत्नाकर मतकरींबरोबर आरण्यक या नाटकात काम केलं. यामध्ये ते धृतराष्ट्राची भूमिका साकारत होते, वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांनी ही भूमिका साकारली होती. मराठी मनोरंजन विश्वामध्येत्यांचा एक दबदबा होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा भारदस्त भूमिका त्यांनी साकारल्या. झुपकेदार मिशा, आवाजातील जरब, त्या त्या भूमिकेसाठी आवश्यक धीरगंभीर चेहरा अशी त्यांची ओळख होती. 06 सप्टेंबर 1937 साली रवी पटवर्धन यांचा जन्म झाला होता. त्यांनी बालकलाकार म्हणून देखील काम केलं आहे. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष बालगंधर्व आणि स्वागताध्यक्ष आचार्य अत्रे होते. अलीकडेच ते 'बबड्याचे आजोबा' म्हणून पुन्हा एकदा घराघरात पोहोचले होते. एक तापट पण तितकेच प्रेमळ अशी आजोबा 'दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी' ही भूमिका त्यांनी साकारली. यावेळी निवेदिता सराफ यांच्या सासऱ्याची भूमिका रवी पटवर्धन यांनी साकारली होती. सासरे आणि सून या नात्यातील एक वेगळा पैलू या भूमिकेतून त्यांनी मांडला. कोरोना काळातील ज्येष्ठ नागरिकांना काम करण्याची परवानगी नसल्याने त्यांना या मालिकेत पुन्हा पाहता आलं नाही. काही वेळा ते व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून या मालिकेत दिसले होते. रवी पटवर्धन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर ते, रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. ते ठाण्याच्या घरात राहत होते, याच घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, सुना, मुलगी, जावई, 4 नातवंड असा परिवार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या