रंगभूमीचा आणखी एक 'तारा' निखळला! ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

रंगभूमीचा आणखी एक 'तारा' निखळला! ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्कानं गुरूवारी सकाळी दहा वाजता निधन झालं.

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्कानं गुरूवारी सकाळी दहा वाजता निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. अविनाश खर्शीकर यांची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून चिंताजनक बनली होती. अखेर  सकाळी ठाणे येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

हेही वाचा...फक्त खुर्ची टिकवण्यासाठी! 26 हजार कोटींच्या घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट

अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली होती. तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली होती.

अविनाश  खर्शीकर यांनी 1978 मध्ये 'बंदिवान मी या संसारी' या मराठी सिनेमाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरूवा केली होती. जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार या सारख्या अनेक सिनेमात अविनाश खर्शीकर यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

मराठी सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी अविनाश एक होते. अविनाश खर्शीकरांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ घातली होती. अनोख्या शैलीमुळे ते तरुणींच्या गळ्यातले ताईत बनले होते. 90 च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांच्या लुकची देखील तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती. सदाबहार अविनाश खर्शीकर यांनी दैनंदिन मालिका ‘दामिनीत’ महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: October 8, 2020, 1:00 PM IST

ताज्या बातम्या