मुंबई, 07 एप्रिल : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते यांचं एक अनोख नातं असल्याचं नेहमीच पाहायला मिळते. आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी त्यांचे चाहते अगदी काहीही करण्यासाठी तयार असतात आणि याची अनेक उदाहरणं आतापर्यंत पाहण्यात आली आहेत. पण अनेकदा हे चाहतेच बॉलिवूडकरांसाठी धोकादायक असल्याचंही दिसून आलं आहे. अशीच एक घटना अभिनेता वरुण धवनसोबत नुकतीच घडली. वरुणला भेटता न आल्यामुळे त्याच्या चाहतीनं चक्क वरुणची गर्लफ्रेंड नताशा दलालच जीवे मारण्याची धमकी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार वरुणच्या सिक्युरिटी टीमनं सांगितलं की, 'वरुणची एक चाहती काही दिवसांपूर्वी त्याला भेटायला आली होती. अन्य चाहत्यांप्रमाणेच तिलाही बराच वेळ वरुणची वाट पहावी लागली. कारण त्या दिवशी वरुण त्याच्या कामात खूप व्यस्त होता. बऱ्याच वेळानंतर वरुण तिथं आला मात्र त्यानं कोणालाही भेटण्यास नकार दिला. त्यामुळे भडकलेल्या चाहतीने बराचवेळ वरुणच्या सिक्युरिटी टीमसोबत वाद घातला आणि तिथून जाण्यासाठी नकार दिला. ती चाहती एवढ्यावरच थांबली नाही तर तिनं सुरुवातीला स्वतःला इजा करून घेण्याची धमकी दिली आणि शेवटी ती एवढी आक्रमक झाली की तिनं वरुणची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिलाच जीवे मारण्याची धमकी दिली.
वरुणची ही चाहती जवळपास 45 मिनिटं वरुणच्या सिक्युरिटी टीमसोबत हुज्जत घालत होती. या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये संबंधित तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'वरुणची ही चाहती व्यवसायानं वकील असून ती बऱ्याच दिवसांपासून नताशाचा पाठलाग करत होती. यासंदर्भात जर वरुणचा जवाब नोंदवला गेल्यास त्या चाहतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल'.