मुंबई, 07 एप्रिल : धर्मा प्रॉडक्शनचा बहुचर्चित सिनेमा 'कलंक' येत्या 17 एप्रिलला सिनेमागृहात रिलीज होत आहे. या सिनेमातील काही गाणी आतापर्यंत रिलीज झाली आहेत. त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला मात्र विशेषकरुन सध्या तरुणाईवर जादू केली आहे ती वरुण धवनच्या 'फर्स्ट क्लास' या गाण्यानं. या गाण्यात वरुण धवन आणि कियारा अडवानी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. पण नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी आणि वरुण धवन याच गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ हरलीननं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.
हरलीन सेठीनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना आता हा डान्स फर्स्ट क्लास आहे की, डिक्टिशन हे तुम्हीच ठरवा असं कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडीओमध्ये वरुण धवन आणि हरलीन सेठी 'कलंक'च्या फर्स्ट क्लास गाण्यावर डान्स करत असून त्यांच्यासोबत कोरिओग्राफर मेलवीन सुद्धा दिसत आहे. यातील हरलीन आणि वरुणची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरली आहे. मागच्या काही दिवसापासून हरलीन विकी कौशलशी ब्रेकअप केल्यानं बरीच चर्चेत आली आहे.
वरुण धवन सध्या 'कलंक'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या शिवाय तो लवकरच श्रद्धा कपूर सोबत 'स्ट्रीट डान्सर'मध्येही दिसणार आहे. कलंकमध्ये वरुण सोबत, आलिया भट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं संजय दत्त आणि माधुरी दीक्षित तब्बल बारा वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. 'कलंक' हे माझ्या वडीलांचं स्वप्न असल्याचं एका मुलाखतीत निर्माता करण जोहरनं सांगितलं होतं. या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला असून आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या रिलीजची प्रतिक्षा आहे.