मुंबई, 30 जानेवारी : शाहरुख खानच्या बिग बजेट पठाण सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पठाणमुळे मराठी सिनेमांना स्क्रिन्स मिळणं कठीण होत असताना मराठी सिनेमांनी यावेळी बॉलिवूड सिनेमांच्या शर्यतीत आपलं स्थान कायम ठेवलं आहे. 13 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर तिसरा यशस्वी आठवडा आहे. प्रेक्षकांचा या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यातही काही थिएटरमध्ये 'वाळवी'चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षक अशा सर्वांनीच 'वाळवी'चे भरभरून कौतुक केले.
'वाळवी' हा मराठीतील पहिला थ्रिलकॉम सिनेमा आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या सिनेमा प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाच्या ट्रेलरनंच सर्वांची उत्सुकता वाढवली होती. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी सारख्या हिट सिनेमांनंतर परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी या जोडीनं पुन्हा एकदा नवी कोरी हटके कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणली. सिनेमाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.
हेही वाचा - टेलिव्हिजनवर का दाखवत नाहीत रितेश जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम'? 20 वर्षांनी कारण आलं समोर
प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की, तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद समाधान देणारा आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून 'वाळवी'चे शोज वाढवण्यात आले आहेत. सध्या 'पठाण' सारख्या बॉलिवूड सिनेमाची चलती असतानाही 'वाळवी’वरही प्रेक्षक तेवढेच प्रेम करत आहेत. हिंदी सिनेमासमोर मराठी सिनेमा ताकदीने उभा आहे, हेच खूप आनंददायी आहे. मुळात मराठी प्रेक्षकवर्ग हा चोखंदळ आहे. चांगल्या कॅान्टेटला ते नेहमीच पसंती देतात आणि म्हणूनच ते असे सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघतात.
वाळवीसह सध्या बांबू, पिकोलो आणि वेड हे मराठी सिनेमे थिएटरमध्ये सुरू आहेत. पठाण रिलीज झाला असला तरी मराठी प्रेक्षक मराठी सिनेमे पाहण्यासाठी प्रामुख्यानं थिएटरमध्ये जाताना दिसत आहेत. वेड सिनेमानं 70 कोटींची कमाई केली आहे. तर बांबू आणि पिकोलो सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये जाताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news