URI Movie Review: 'उनको काश्मीर चाहीये और हमे उनका सीर'

URI Movie Review: 'उनको काश्मीर चाहीये और हमे उनका सीर'

सैनिकाच्या मनातील चीड, देशप्रेम, शौर्य, वेदना हे सगळे भाव विकीने इतक्या समर्पकपणे सिनेमात मांडलं आहे की, ते प्रेक्षकांपर्यंत आपसूक पोहोचतात.

  • Share this:

'ये नया हिंदोस्तान है.. ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी...' हा संवादच 'URI' सिनेमा कसा आहे याची कल्पना देतो. विहान सिंग शेरगील (विकी कौशल) एक सळसळतं रक्त असणारा सैनिक, ज्याला उरीवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा सूड घ्यायला तो उतावीळ असतो. आपल्या १९ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचं चित्तथरारक चित्रण उरी सिनेमात केलं आहे. कट्टर देशभक्ती आणि देशासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेल्या जवानांची ही कहाणी आहे.

मणिपूर, पंजाब आणि उरी इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेतला. मणिपूरमध्ये दहशतवाद्यांना नेस्तनाबुत करणाऱ्या तुकडीचा मेजर विहान (विकी) प्रमुख असतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताची मणिपूर मिशन यशस्वी होते. मेजर विहान हा त्याच्या शौर्यासाठी ओळखला जात असतो. मात्र त्यानंतर काही खाजगी कारणामुळे विहान निवृत्तीचा अर्ज करतो. मात्र त्याचं शौर्य पाहून सरकार त्याला दिल्लीमध्ये आर्मी बेसमध्ये काम करण्यास सांगतं.

या दरम्यान दहशतवादी उरीवर हल्ला करतात. या हल्ल्यात विहान त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि बहिणीच्या नवऱ्याला करणला गमावतो. करणची भूमिका मोहित रैनानी अतिशय समर्पकरित्या वठवली आहे. जवानांचा फिटनेस काय असतो याची ओळख तुम्हाला हा सिनेमा पाहताना नक्कीच होईल. तसंच भारतीय सैनिकांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचा रुबाब, त्यांचं प्रशिक्षण तसंच त्यांचं निस्सीम देशप्रेम संपूर्ण सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये दिसतो.

आपल्या जवळच्या सहकाऱ्याला गमवल्याची सल मेजर विहानच्या मनात सलत असते. दरम्यान भारत सरकार सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेतात आणि विहानची या योजनेचा मास्टर माईंड म्हणून नियुक्ती करतात. या सिनेमात तुम्हाला ओढून ताणून आणलेली देशभक्ती दिसणार नाही. घटना जशा घडत जातात त्यापद्धतीने तुमच्या मनात त्याबद्दलची चीड, द्वेष निर्माण होत जाते. दिग्दर्शक आदित्य धार यांच्या अभ्यासाला आणि संशोधनाला संपूर्ण गुण दिले पाहिजेत. धार यांच्या डोक्यातील प्रत्येक गोष्ट सिनेमात उतरवायला ते यशस्वी ठरले आहेत असंच म्हणावं लागेल. सिनेमा पाहताना खाजगी आयुष्यातील हळवे सैनिक ते युद्धातले तेवढेच निडर सैनिक उत्तमरित्या धारने दाखवले आहेत. आपला जवळता मित्र गमावण्याचं दुःख सिनेमात जेवढं सैनिकांना होतं तेवढंच सिनेमा पाहताना तुम्हालाही होतं, हे दिग्दर्शकाचं यश आहे.

सरकारला तसंच लष्कराला एखादा निर्णय किती विचारपूर्वक घ्यावा लागतो, त्याची आखणी करण्यासाठी किती मातब्बरांची गरज असते हे सिनेमात अनेकदा अधोरेखित केलं आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना एक सैनिक, राजकीय नेते काय करतात आणि आपण नागरिक म्हणून देशासाठी काय करतो हा प्रश्नही मनात येऊन जातो. हेच खरं सिनेमाचं यश आहे.हा सिनेमा पूर्णपणे शत्रूच्या हल्ल्याचा बदला घेण्यावरच आधारित असल्यामुळे सिनेमातील संवाद तुम्हाला आपसूक आवडतात आणि पटतातही. त्यामुळे सिनेमात असे अनेक संवाद आहेत जे ऐकताना आपसूक आपण टाळ्या वाजवू. त्यातील एक म्हणजे 'ये नया हिंदोस्तान है.. ये घर में घुसकर मारेगा'...

एकीकडे भारतीय लष्कराची ताकद तुमची छाती अभिमानाने फुलवते तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचा ढिला कारभार तुम्हाला हसायला लावतो. सिनेमात पाकिस्तानची बाजू इतर सिनेमांप्रमाणे मजेशीर दाखवली आहे.

उत्तरार्धात खऱ्या सर्जिकल स्ट्राइकला सुरुवात होते. मित्राच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी विहान कशा पद्धतीने सर्जिकल स्ट्राइकची व्युहरचना आखतो. यासाठी त्याला गुप्तचर यंत्रणा, सरकार आणि इतर अनेक संस्था कशा मदत करतात हे पाहायला मिळतं. हे पाहत असताना आपसून आपण त्यांचाच एक भाग होऊन जातो. विहानने पहिल्या पावलापासून ते शेवटच्या पावलापर्यंत सर्जिकल स्ट्राइक कसा होईल याची आखणी कशी केली. नेमकी हे स्ट्राइक कसं झालं हे पाहण्यासाठी एकदा तरी हा सिनेमा पाहा.

सिनेमात यामी गौतमला फार छोटी भूमिका आहे. यामीची सिनेमातील एण्ट्री फार आश्वासक वाटते. मात्र तिची भूमिका अजून खुलवता येऊ शकली असती. सिनेमाचा पूर्वार्ध संथ वाटत असला तरी उत्तरार्ध तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो. पूर्वार्धातील अनेक गोष्टी एडिट करता आल्या असत्या असं वाटतं. तसंच अभिनेत्री कीर्ती कुल्हारीची भूमिका अगदी छोटेखानी आहे. मात्र या भूमिकेलाही तिने योग्य न्याय दिला आहे. जिकडे कथा संथ वाटते तिकडे कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने ती उणीव भरून काढली आहे.

सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे कलाकारांचा अभिनय आणि पार्श्वसंगीत. या दोन गोष्टी तुम्हाला शांत बसू देत नाहीत. बॉम्ब हल्ले, गोळी बार हा अगदी आपल्या समोरच चालला आहे असं वाटतं. युद्धपट असल्यामुळे सिनेमातली अॅक्शन सीनही सिनेमाला योग्य आहेत. अॅक्शन पाहताना आपण अतिशयोक्ती पाहत आहोत असं कुठेही वाटत नाही. परेश रावल यांनीही त्यांची भूमिका चोख वठवली आहे. संपूर्ण सिनेमात कायम लक्षात राहतो तो विकी कौशल. विकीने मेजर शेरगीलची भूमिका खऱ्या अर्थाने जगली असंच म्हणावं लागेल. सैनिकाच्या मनातील चीड, देशप्रेम, शौर्य, वेदना हे सगळे भाव विकीने इतक्या समर्पकपणे सिनेमात मांडलं आहे की, ते प्रेक्षकांपर्यंत आपसूक पोहोचतात. सैनिकाचं आयुष्य काय असतं आणि उरी हल्ला नेमकी कसा झाला याबद्दल एकदा जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे.

प्रमुख भूमिका : विकी कौशल, मोहित रैना, यामी गौतम, परेश रावल

दिग्दर्शक : आदित्य धर

निर्माते : रोनी स्क्रूवाला

- मधुरा नेरुरकर

First published: January 9, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading