नागराजच्या ‘नाळ’ला शनाया देणार टक्कर

नागराजच्या ‘नाळ’ला शनाया देणार टक्कर

येत्या शुक्रवारी म्हणजे 16 नोव्हेंबरला चक्क चार मराठी सिनेमे रिलीज होतायत. 'नाळ', 'व्हॅनिला, स्ट्राॅबेरी आणि चाॅकलेट', ' एक सांगायचंय UNSAID HARMONY' आणि 'गॅटमॅट' असे चार सिनेमे एकाच दिवशी रिलीज होतायत.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : दर वर्षी दिवाळीत मोठे सिनेमे रिलीज केले जातात. त्यामागे बरीच मोठी आर्थिक गणितं असतात. याही वर्षी 'ठग्स आॅफ हिंदोस्तान' आणि 'आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर' रिलीज झालेत. सुट्ट्यांचा फायदा सिनेमांना मिळतोच. शक्यतो दिवाळीच्या आधीच्या आणि नंतरच्या आठवड्यात कुठलाही सिनेमा रिलीज केला जात नाही. यावर्षी मात्र याला अपवाद ठरलेत ते मराठी सिनेमे.

येत्या शुक्रवारी म्हणजे 16 नोव्हेंबरला चक्क चार मराठी सिनेमे रिलीज होतायत. 'नाळ', 'व्हॅनिला, स्ट्राॅबेरी आणि चाॅकलेट', ' एक सांगायचंय UNSAID HARMONY' आणि 'गॅटमॅट' असे चार सिनेमे एकाच दिवशी रिलीज होतायत.

अभिनेता लोकेश विजय गुप्ते आता दिग्दर्शक म्हणून आपल्या पुढे येतोय. देवी सातेरी प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या 'एक सांगायचंय.... UNSAID HARMONY'  या चित्रपटात बॉलिवूडमधील दमदार अभिनेता के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव ही जोडी पहिल्यांदाच मराठीत  एकत्र झळकणार आहे.

आई-वडिलांसोबत मुलांचा हरवत असलेला संवाद सिनेमाचा मुख्य विषय आहे.  के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी सिनेमाचं टायटल लाँच केलं होतं. त्यावेळी के. के मेनन म्हणाला, ' मी मराठी सिनेमे पाहतो. ते आशयघन आहेत. मला मराठी कळतं. बोलता येत नाही. पण या सिनेमासाठी मी मराठीचे धडे गिरवतोय.'

दुसरा सिनेमा आहे गॅटमॅट. या सिनेमा अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे कलाकार आहेत. काॅलेज तरुण-तरुणींचं प्रेम जुळवून देण्यासाठी दोन मित्र रंग्या आणि बगळ्या स्वत:ची एजन्सी सुरू करतात. मग सुरू होतात एकेक गमतीजमती. अगदी त्यांची रवानगी तुरुंगात होण्यापर्यंतही घटना घडतात. या सिनेमात रसिका सुनील म्हणजेच 'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया आहे.

तिसरा सिनेमा आहे व्हॅनिला, स्ट्राॅबेरी आणि चाॅकलेट. हा सिनेमा एक कुत्रा आणि मुलगी यांच्याभोवती फिरतो. सगळे नवे कलाकार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ आणि त्यांची लेक अभिनेत्री जानकी पाठक चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

या तीन सिनेमांचा विचार करता फक्त शनायाला पाहण्यासाठी काही लोक गॅटमॅटला जातीलही. कारण शनाया ही व्यक्तिरेखा लोकप्रिय होती. पण एका वेळी इतके सिनेमे रिलीज झाल्यावर सिनेमांचे शोज कमी लागतात. प्रेक्षकांचा मग प्राॅब्लेम होतो.

व्हॅनिला...चं तर काही खरं दिसत नाही. खरं तर सिनेमाची पटकथा चांगली असू शकते. पण सिनेमांच्या गर्दीत नवखे चेहरे हरवून जातील असं वाटतं.

एक सांगायचं... सिनेमा कदाचित विषयामुळे प्रेक्षकांना ओढू शकतो. पण अभिनेता के के मेनन आणि राजेश्वरी यांच्या जोरावर तो खूप चालेल, असं काही सांगता येत नाही.

आशा ठेवता येईल ती 'नाळ'वर. नागराज मंजुळेनं सिनेमाची फक्त निर्मिती आणि त्यात भूमिका केली असली तरीही नुसतं ट्रेलर पाहून सिनेमाला नागराज टच जाणवतोच. ट्रेलरच मनाला स्पर्श करतं. त्यामुळे प्रेक्षक सिनेमाकडे वळतील, असं वाटतंय. पण इथेही एका वेळी इतके सिनेमे रिलीज झाले, तर प्रेक्षकांपुढे अडचणी येऊ शकतात. त्यांना जो सिनेमा बघायचाय तो त्यांच्या जवळच्या थिएटरमध्ये हव्या त्या वेळेला लागेल असंच नाही.

आणखी एक गोष्ट या एका वेळी रिलीज होणाऱ्या सिनेमांना मारक ठरणार आहे. ती म्हणजे 'आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा. पुन्हा आता या सिनेमाचे शोज वाढवण्यासाठी आंदोलनं सुरू झालीयत. तेव्हा पुन्हा एकदा थिएटर मालक कुठल्या मराठी सिनेमाला कसा न्याय देणार हा मोठा प्रश्न आहे. काशिनाथचे शोज वाढले तर नाळला धोका निर्माण होऊ शकतो.

अनेक मराठी सिनेमे आशयसंपन्न असतात. मग अशा वेळी एकाच वेळी इतके सिनेमे रिलीज का केले जातात? त्याआधी संबंधित लोक एकमेकांशी काही बोलत नाहीत का? काशिनाथसारखा चांगला सिनेमा रिलीज झाल्यावर इतर मराठी सिनेमांनी थोडं थांबायला हवं होतं. ते का नाही झालं?

यामुळे सिनेमांचं नुकसान तर होतंच, पण रसिक प्रेक्षकांवरही अन्याय होतो, त्याचं काय?

सपना चौधरी पुन्हा चर्चेत, पाठीवर काढला टॅटू आणि लिहिलं...!

First published: November 10, 2018, 4:11 PM IST

ताज्या बातम्या