कोची; 18 डिसेंबर: गुरूवारी कोची येथील एका नामांकित मॉलमध्ये एका प्रसिद्ध मल्याळी अभिनेत्रीला काही टवाळ तरुणांनी लैंगिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती अभिनेत्रीनं स्वतः आपल्या सोशल मीडिया पेजवरुन दिली आहे. तिला दोन तरुणांनी लैगिंक त्रास दिल्याचं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिनं सांगितलं की ती मॉलमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत खरेदी करत होती, तेव्हा दोन जणांनी मुद्दामहून तिच्या अंगाला वाईट भावनेनं स्पर्श केला.
तिनं आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं की, “मी मॉलच्या बिलिंग लाइनमध्ये उभी होते, तेव्हा तिथं दोन तरूण माझ्या पाठीमागं काही अंतरावर उभे होते. येथे लोकांची काही प्रमाणात गर्दीही होती. या गर्दीचा फायदा घेऊन यातील एकाने माझ्या पाठीला स्पर्श केला. हा स्पर्श त्यांनी जाणूनबुजून केल्याचं मला जाणवलं. मी लगेच त्यांना काही म्हटलं नाही, पण काहीतरी चुकीचं घडतयं असं त्यांना देहबोलीतून दाखवून दिलं, जेणेकरून तो स्पर्श चुकून झाला असेल तर ते काळजी घेतील. झालेला हा सर्व प्रकार माझ्या बहिणीनं अगदी स्पष्टपणे पाहिला होता. कारण ती माझ्यापासून काहीचं अंतरावरचं उभी होती. ती माझ्याजवळ आली आणि सर्व ठीक आहे का? असं विचारलं. पण त्यावेळी मी खरंच एका अवघडलेल्या स्थितीत होते.
यानंतर एक मिनिटं काय करावं हे मला सुधारलं नाही, मी सुन्न झाले होते. जेव्हा मी त्या दोन तरुणांच्या दिशेनं वळाले तेव्हा त्यांनी मला पूर्णपणे इग्नोर केलं. त्यानंतर त्यांना कळालं की झालेला प्रकार माझ्या लक्षात आला आहे. मग त्या दोघांनी तातडीनं ती लाइन सोडली. तरीही माझ्या मनात अजूनही खूप राग होता, कारण मी त्यावेळी काहीही बोलू शकली नाही. त्यानंतर मी आणि माझी बहीण या लाइनमधून बाहेर पडलो आणि भाजीच्या काउंटरकडे माझ्या आई आणि भावाकडे गेलो. ती दोन लोकं पून्हा आमच्या पाठीमागं आली होती.
तिनं सांगितलं की, त्या दोन्ही पुरुषांनी परत तिचा पाठलाग केला आणि आगामी चित्रपटांबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. “पण यावेळी मी त्यांच्याकडे वळले आणि स्पष्ट शब्दांत तेथून निघून जाण्यास सांगितलं. माझी आई जेव्हा आमच्याकडं आली, तेव्हा त्यांनी तेथून काढता पाय घेतला."
तिनं पुढं असंही म्हटलं की, या जगात स्त्री म्हणून वावरणं खूप अवघड आहे. कारण आपल्याला घराबाहेर पडल्यानंतर प्रत्येक मिनिटाला सावध राहणं आवश्यक आहे.