मुंबई, 06 ऑगस्ट : आणखी एका अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे टेलिव्हिजन विश्व हादरले आहे. टीव्ही अभिनेता समीर शर्मा याने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. अवघ्या 44 व्या वर्षी त्याने आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला. दरम्यान समीरने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मेंटल हेल्थ संदर्भात पोस्ट शेअर केली होती. 'सुशांतबद्दल काही जरी वाटत असेल, तर ही पोस्ट वाचा', अशी कॅप्शन देत त्याने ही पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर या विषयांवर भाष्य केले होते.
दरम्यान याप्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. समीर टेलिव्हिजन विश्वातील एक ओळखीचा चेहरा होता. समीरनं प्रसिद्ध मालिका कहानी घर घर की, क्यूं की सांस भी कभी बहू थी, 'कहानी घर घर की', 'लेफ़्ट राइट लेफ़्ट', 'इस प्यार को क्या नाम दूं' अशा मालिकांमध्ये काम केले होते. त्याच्या जाण्यानें संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्री हादरली आहे.
समीरचा मृतदेह बुधवारी रात्री मालाड पश्चिमेस अहिंसा मार्गावर असलेल्या नेहा नावाच्या इमारतीतील त्याच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह किचनच्या सिलिंगला लटकलेला होता. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने यावर्षी फेब्रुवारीमध्ये हे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते.
(हे वाचा-EXCLUSIVE: रियाने ब्लॉक केला होता सुशांतचा नंबर, दोघांचे कॉल डिटेल्स आले समोर)
रात्रीच्या ड्युटीदरम्यान फेरफटका मारत असताना सोसायटीच्या वॉचमनने मृतदेह पाहिला आणि सोसायटीच्या सदस्यांना याबाबत माहिती दिली. मृतदेहाची स्थिती पाहता दोन दिवसांपूर्वी अभिनेत्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट न सापडल्यामुळे अभिनेत्याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.