फक्तच फडफड...न पेटलेली ट्युबलाईट !

फक्तच फडफड...न पेटलेली ट्युबलाईट !

शर्ट काढणारा सलमान, बायसेप दाखवणारा सलमान, तुम्हाला आवडत असेल तर 'ट्युबलाईट' तुमच्यासाठी नाही. 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान'चा सलमान तुम्हाला बघायला मिळणार नाही. ट्युबलाईट हा हॉलीवूड मुव्ही 'लिटील बॉय'पासून इन्सपायर्ड आहे. 'जगतपूर' नावाच्या छोट्याशा गावातली ही कथा आहे. दोन भावांची आणि नात्यांवरच्या विश्वासाची.

  • Share this:

अमित मोडक, समीक्षक

"माँ-बाप के बाद आपने ही संभाला है! यकीन पक्का हो तो इन्सान चट्टाण भी हिला सकता हे!.." हे काही डायलॉग्ज आहेत 'ट्युबलाईट'मधले.

ऐकलेत ना खूप वेळा, मी पण ऐकलेत परत ट्युबलाईटमध्ये. या काही डायलॉग्जवरून तुम्हाला साधारण कल्पना येईल ट्युबलाईट कसा आहे?

शर्ट काढणारा सलमान, बायसेप दाखवणारा सलमान, तुम्हाला आवडत असेल तर 'ट्युबलाईट' तुमच्यासाठी नाही. 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान'चा सलमान तुम्हाला बघायला मिळणार नाही. ट्युबलाईट हा हॉलीवूड मुव्ही 'लिटील बॉय'पासून इन्सपायर्ड आहे. 'जगतपूर' नावाच्या छोट्याशा गावातली ही कथा आहे. दोन  भावांची आणि नात्यांवरच्या विश्वासाची.

सलमान खान ट्युबलाईट आहे. असा मुलगा ज्याचा ट्युब हळूहळू पेटतो. लक्ष्मण (सलमान खान) जो स्लो आहे त्याला एक भाऊ आहे भरत (सोहेल खान).  लक्ष्मण पूर्णपणे आपल्या लहान भावावर अवलंबून आहे. लहान भाऊ मोठ्या भावाची काळजी घेतो. दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. एक बन्ने चाचा आहेत (ओम पुरी) जे दोघा भावांवर लक्ष ठेवून असतात. बाकी वेळ ते लक्ष्मणला (सलमानला) गांधीजींचे विचार शिकवतात. का, कुणास ठाऊक पण मूळ चायनीज असलेली लिलिंग (चायनीज अभिनेत्री झू झू) आणि तिचा मुलगा गुवाऊ (मॅटीन) जगतपूरमध्ये राहायला येतात. खरं तर या प्लॉटमध्ये अजिबात दम नाही. फक्त हिंदी-चिनी भाई-भाई दाखवण्यासाठी लिलिंगला कोलकात्याहून थेट जगतपूरला आणलंय. सोबत तिचा क्यूट मुलगा आहे ज्याच्याशी मैत्री करण्याचा सलमान प्रयत्न करतो आणि मित्रही होतो. नारायण नावाचा व्हीलन आहे जो उगाच सलमानला मारत राहतो. वाईट वाटण्यापेक्षा इरिटेड होतं की बास्स आता.

सगळं काही नीट सुरू असताना भारत-चीन युद्ध सुरू होतं आणि सोहेल खान युद्धासाठी जातो. इथेच इंटरव्हल होतो. युद्धात काय होणार? सलमान काय करणार? याची थोडीफार उत्सुकता वाटते. पण फारसं काही घडत नाही. युद्धाचे सिक्वेन्स अत्यंत गरीब आहेत.

कबीर खाननं युद्धाच्या सीन्सवर जराही मेहनत घेतलेली नाही.  अत्यंत विस्कळीत आहे. सैनिक चालतायत का माहीत नाही? कुठे जातायत माहीत नाही? पायी का जातायत  माहीत नाही? असो, कबीर खान आणि सलमान खानचा सिनेमा बघताना असे फालतू प्रश्न विचारायचे नसतात. 150 मिनिटांची फिल्म खूप ताणलीय. इमोशन्स घुसडलेत. नंतर नंतर सलमान रडायला लागल्यावर मी  व्हॉट्सअॅपचे मेसेज चेक करायला लागलो. जादूगार शाहरुखही येतो. पण सीनमध्ये जादू नाही. रईसच्या सेटवरुन थेट ट्युबलाईटच्या सेटवर आलाय असं वाटतं.

सलमान खाननं नवीन काही करण्याचा प्रयत्न केलाय. "प्रेम रतन धन पायो" आणि "बजरंगी भाईजान"मधल्या  सलमान गुणेले दहा केल्यावर जो इनोसन्स तयार होईल तो म्हणजे ट्युबलाईटमधला सलमान. बजरंगी  भाईजानमधले इमोशनल सीन्स तुम्हाला रडवतात, किमान पापण्या ओलावतात. ट्युबलाईटमध्ये तसं होत नाही.

जबरदस्तीनं तुम्हाला इमोशनल व्हायला भाग पाडतायत असं वाटतं. मुळात कथानकच अत्यंत दुबळं आहे आणि त्यामुळे सिनेमा पुरता फसलाय. नसलेल्या कथेला दीडशे मिनिटं खेचल्यावर जे व्हायचंय तेच ट्युबलाईटचं झालंय.

सोहेल खाननं त्यात डिसेंट काम केलंय. लिलिंग गोड आहे. लहान मॅटीन भाव खाऊन जातो. गाणी ठिकठाक आहेत. थिएटरमधून बाहेर पडताना तुम्ही गाणी तिथंच विसरून बाहेर पडता.

सलमानचा प्रयत्न, लहान मुलाच्या गोडव्यासाठी दोन स्टार आणि कबीर खानच्या न घेतलेल्या मेहनतीला हाफ स्टार. ट्युबलाईटला मी देतो अडीच स्टार.

फिल्ममध्ये एक वाक्य आहे. "यकिन पक्का हो तो आप चट्टान भी हिला सकते है!" हाच यकिन कबीर खानला  आहे. कथा असो - नसो फिल्म पैसे कमावणार. मी कितीही स्टार दिले तरी सलमानचे फॅन बघायला जाणारच.  फक्त एकच सल्ला देतो. मंथ एंड आहे. नाही बघितला तरी चालेल किंवा किमान पगार होईपर्यंत वाट बघू  शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 05:16 PM IST

ताज्या बातम्या