थिएटरमधला टाॅर्चमॅन झळकणार मोठ्या पडद्यावर

थिएटरमधला टाॅर्चमॅन झळकणार मोठ्या पडद्यावर

थिएटरमध्ये चित्रपट बघायला येणाऱ्या प्रेक्षकाला अंधारात टॉर्चच्या उजेडात त्याच्या सीटपर्यंत पोहचवणारा गरीब घरातला संदीप आता मराठी रुपेरी पडद्यावर ‘हिरो’ म्हणून चमकणार आहे.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : आयुष्यात अनेक योगायोग होतात, अनेक अकल्पित गोष्टी घडत असतात. असाच एक योगायोग संदीप साळवे या युवकाच्या बाबतीत घडला आहे. थिएटरमध्ये चित्रपट बघायला येणाऱ्या प्रेक्षकाला अंधारात टॉर्चच्या उजेडात त्याच्या सीटपर्यंत पोहचवणारा गरीब घरातला संदीप आता मराठी रुपेरी पडद्यावर ‘हिरो’ म्हणून चमकणार आहे. ८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ या चित्रपटात तो आपल्याला रॉकीच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ते जी स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अखंड परिश्रम करतात आणि दुसरी ती जी स्वतःच्या स्वप्नांना बाजूला सारून आहे ती वाट चोखाळण्यात धन्यता मानतात. संदीपने यातील पहिली वाट चोखाळली. एकेकाळी अंधारात प्रेक्षकांना टॉर्च दाखवून सीटपर्यंत पोहचवणारा संदीप आज त्या अंधारातून बाहेर पडत चंदेरी दुनियेच्या झगमगाटात आपलं पहिलं पाऊल टाकतोय.  ‘रॉकी’ या चित्रपटात एका डॅशिंग भूमिकेत तो प्रेक्षकांना दिसणार आहे. या भूमिकेसाठी फिटनेसपासून ते अगदी लुकपर्यंत संदीप याने खूप मेहनत घेतली आहे.

आपल्या या पदार्पणाबद्दल बोलताना संदीप सांगतो की, बेताच्या असणाऱ्या परिस्थितीचा बाऊ न करता आईवडिलांनी मोठ्या कष्टाने मला वाढवलं आहे. मी देखील त्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवत कष्ट करत राहिलो. २००३ मध्ये मी चेंबूरमधील अमर थिएटरमध्ये ‘टॉर्चमन’ म्हणून काम करायचो. या चित्रपटाचे दिग्दर्शक अदनान ए शेख याची आणि माझी ओळख होती. या चित्रपटासाठी त्यांनी मला विचारलं माझ्यासाठी हे सारं स्वप्नवत होतं पण आजवर प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं फळ असून रुपेरी पडद्यावर आज स्वत:ला पाहताना त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय.

या सिनेमातून संदीप साळवेसोबत अक्षया हिंदळकर हा फ्रेश चेहरा तसंच अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत आणि हिंदीतील अभिनेते राहुल देव हे नावाजलेले कलाकारही दिसणार आहेत.

आतापर्यंत प्रेक्षकांना काळोख्या थिएटरमध्ये सीटपर्यंत नेणारा संदीप, आता तोच थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर झळकतोय. 8 मार्चला सिनेमा रिलीज होतोय.

#FitnessFunda : बाॅलिवूडची 'चिकनी चमेली' कतरिनाच्या फिटनेसचं 'हे' आहे राज!

First published: February 22, 2019, 5:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading