S M L

सौंदर्याची मल्लिका मधुबालाचा आज जन्मदिन!

प्रेमाच्या देवतेचा जन्म झाला. जिने संपूर्ण भारताला आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेमात पाडलं.

Sonali Deshpande | Updated On: Feb 14, 2018 12:53 PM IST

सौंदर्याची मल्लिका मधुबालाचा आज जन्मदिन!

मनाली, 14 फेब्रुवारी : १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन्स डे, जगभरात प्रेमाचा दिवस. याच प्रेमाच्या दिवशी सौंदर्यांचं मूर्तिमंत उदाहरण जन्माला आलं. प्रेमाच्या देवतेचा जन्म झाला. जिने संपूर्ण भारताला आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेमात पाडलं. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला अर्थात मुमताझ जहन नेहलवी होती.

बॉलिवूडमध्ये आपल्या कर्तृत्वानं एक वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रीचं वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी हृदयाला छिद्र असल्यामुळे निधन झालं. मधुबालाच्या मृत्यूनंतर तिला हॉलिवूडच्या मर्लिन मन्रो, कॅरोल लोम्बार्ड, जूडी गरलॅण्ड आणि मीना कुमारी यांच्या पंक्तीत जाऊन बसवलं. अवघं छत्तीस वर्षांचं आयुष्य ती जगली. एवढ्याशा आयुष्यातच  ती भारतीय रसिकांची आवडती अभिनेत्री बनली.अलौकिक सौंदर्य म्हणजे काय असू शकतं हे दाखवणारं हे व्यक्तिमत्त्व म्हणजेच मधुबाला. त्या सौंदर्याला अदभुत अभिनयाची जोड दिली ती मधुबालाने.अशा प्रकारचं सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाफ जगात फार कमी पहायला मिळतो.हिंदी चित्रपटसृष्टीने मधुबालाच्या निमित्तानं अनुभवण्याची संधी भारतीय सिनेरसिकांना दिली.

मुंबईत झालेल्या गोदीच्या स्फोटात त्यांचं घर उद्ध्वस्त झालं. मात्र मधुबालाचं कुटुंब वाचलं ते केवळ चित्रपट पाहायला गेल्यामुळेच. घरच्या परिस्थितीमुळे अवघ्या नवव्या वर्षीचं तिला सिनेमात काम करावं लागलं. छंद म्हणून नाही तर केवळ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी. बालकलाकार म्हणून १९४२ साली आलेला 'बसंत' हा तिचा पहिला सिनेमा. अभिनेत्री देविका रानी तिच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनीच तिला मधुबाला हे नाव दिलं.

नायिका म्हणून मधुबालाचा आलेला पहिला चित्रपट होता बॉम्बे टॉकीज निर्मित 'महल'. याच वर्षी तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट यशस्वी होत गेले.आपल्या सत्तरहून अधिक चित्रपटांच्या कारकिर्दीत मधुबालाने जवळजवळ सगळ्याच जॉनरचे चित्रपट केले. महल, बरसात की एक रात, मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस ५५, चलती का नाम गाडी, यांसारख्या सर्वच चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका अजरामर झाल्या. मुगल-ए-आझम' या चित्रपटातली तिनं साकारलेली अनारकली तर थेट रसिकांच्या हृदयातच भिडली. मधुबाला अल्पायुषी ठरली. मात्र आपल्या आजारपणावरही मात करत ती काम करत राहिली.

मधुबालाचे बोलके डोळे, तिचं हास्य, त्यातला गोडवा हे खूपच विलक्षण. गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीनं अखेर २३ फेब्रुवारी १९६९ रोजी जगाचा निरोप घेतला. पण त्यानंतर आजतागायत या लोभस चेहऱ्याची जादू आपल्यावर कायम आहे आणि यानंतरही राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close