मुंबई, 30 मार्च- बॉलिवूडचे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना इंडस्ट्रीतील पहिला सुपरस्टार म्हटलं जातं. फारच कमी लोकांना माहिती असेल की, त्याकाळातील एक 'टॅलेंट हंट' शो जिंकून राजेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. 'आनंद', 'कटी पतंग', 'सफर' आणि 'दाग' यांसारख्या हिट चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचं देखणं रुपच नव्हे तर त्यांची दमदार शैलीही लोकांना प्रचंड पसंत पडायची. सेलिब्रेटी आणि लोक त्यांना प्रेमाने 'काका' म्हणत असत. प्रेक्षकांनी त्यांना अनेक अभिनेत्रींसोबत पडद्यावर अभिनय करताना पाहिलं आहे. परंतु शर्मिला टागोरसोबतची त्यांची जोडी 70 च्या दशकात सुपरहिट ठरली होती. मात्र नंतर या अभिनेत्रीने राजेश खन्नासोबत काम करणंच बंद केलं होतं. यामागे कारणंही तितकंच रंजक आहे.
राजेश खन्ना हे त्याकाळात लोकप्रिय होते तर शर्मिला टागोरसुद्धा आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी अनेक अभिनेत्यांबरोबर काम करत आपला ठसा उमठवला आहे. शर्मिला टागोर यांचं सौंदर्य आणि गालावरच्या खळ्यांनी सर्वच क्लीन बोल्ड होत असत. राजेश खन्नासोबतही त्यांची जोडी प्रचंड गाजली होती. त्यांना एकत्र पाहायला लोकांना आवडत होतं. अनेक सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर शर्मिला टागोर यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत काम करणं बंद केलं होतं. याचं कारण त्यांनी स्वतः एका मुलाखतीत उघड केलं होतं.
राजेश खन्ना यांच्या बर्थ ऍनिव्हर्सरीनिमित्त शर्मिला यांनी 'ऑडिबल'शी संवाद साधताना याचं कारण उघड केलं होतं. याबाबत बोलतांना त्यांनी म्हटलं होतं की, 'काकांची ती गोष्ट जिचा माझ्यावर सर्वात जास्त परिणाम झाला. ती म्हणजे त्यांचं सेटवर उशिरा येणं. 9 वाजण्याच्या शिफ्टसाठी ते 12 च्या आधी कधीच आले नाहीत. त्यामुळेची आमची जोडी इतकी लोकप्रिय असतानाही मी इतर कलाकारांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.'' शर्मिला आणि राजेश खन्ना यांनी 'आराधना', 'अमरप्रेम', 'सफर' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
अभिनेत्रीने पुढे बोलताना सांगितलं की, राजेश खन्ना यांचं स्टारडम इतकं जास्त होतं की, 9 ते 90 वयोगटातील महिलाही त्यांना पाहण्यासाठी स्टुडिओबाहेर रांगेत उभ्या राहात होत्या. राजेश खन्ना यांची फिल्मी कारकीर्द जितकी भव्य आणि ग्लॅमरस होती. तितकंच त्यांचं खाजगी आयुष्य दुःखद होतं. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी 1973 मध्ये अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या अवघ्या 9 वर्षांनी ते 1982 मध्ये विभक्त राहायला लागले होते.
लग्नानंतर डिंपल यांनी सिनेमात काम करु नये असं राजेश खन्ना यांना वाटत होतं. सुरुवातीला डिंपलने त्यांना होकार दिला होता. पण काही वर्षांनी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा निर्माण झाली, तेच त्यांच्या विभक्त होण्याचं कारण बनलं होतं. या जोडप्याला ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली आहेत. राजेश खन्ना यांचं 18 जुलै 2012 रोजी कर्करोगाने निधन झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment