मुंबई, 11 मे : केदारनाथ आणि सिंबा या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. पण लॉ स्टूडंट ते अभिनेत्री हा साराचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. दोन्ही सिनेमांत स्लीम ट्रीम दिसणारी सारा काही वर्षांपूर्वी तुम्ही पाहिली असती तर ही सारा अली खान आहे यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. सिनेमात येण्यापूर्वी साराचं वजन 96 किलो होतं. पण अभिनेत्री बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साराला जिममध्ये खूप घाम गाळावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत सारानं तिचा 'फॅट टू फिट' प्रवास सांगितला.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सारानं आपला अभ्यास पूर्ण करावा अशी तिच्या वडीलांची इच्छा होती. कॉलेजमध्ये असताना सारा खूप अभ्यासू होती. खाणं आणि अभ्यास एवढंच तिचं जग. ती न्यूयॉर्कमध्ये राहत असताना तिला जंक फूड खाण्याची सवय लागली होती. ज्यामुळे तिचं वजन 96 किलो पर्यंत वाढलं. अभ्यासासोबतच जेव्हा सारानं तिच्या अभिनेत्री बनण्याच्या स्वप्नाबद्दल विचार करायाला सुरुवात केली त्यावेळी तिला लक्षात आलं की, हे असं आपल्याला बॉलिवूडमध्ये कोणीही स्वीकारणार नाही. त्यामुळे तिनं हे वजन कमी करायचं ठरवलं.
सारा सांगते, 'सुरवातीला मी माझ्या खाणं, खाण्याच्या वेळा यावर नियंत्रण करायला सुरुवात केली. मी जंक फूड खाणं पूर्णपणे बंद केलं. नियमित व्यायाम, सायकलिंग, बॉक्सिंग याच्या सहाय्याने मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली आणि या सर्वात आणखी एक गोष्ट मी केली होती ती म्हणजे मी माझ्या आईला पूर्ण एक वर्ष भेटले नव्हते किंवा तिच्याशी व्हिडिओ कॉल केला नव्हता. जेव्हा मी भारतात परतले तेव्हा तिनं मला माझ्या बॅगवरुन ओळखलं. एवढा माझ्या लुकमध्ये बदल झाला होता. पण ती माझ्यासाठी खूप आनंदी होती. आजही मी रोज कमीत कमी दीड तास व्यायाम करते.'
बॉलिवूड पदार्पणातच 'सिंबा' आणि 'केदारनाथ' सारखेसुपरहिट सिनेमे देणाऱ्या साराला फिल्म फेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला आहे. लवकरच सारा कार्तिक आर्यन सोबत 'लव्ह आजकल'च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाच दिग्दर्शन इम्तियाज अली करत असून हा सिनेमा 2020मध्ये व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित होणार आहे.