04 एप्रिल : येत्या शुक्रवारी 2 हिंदी सिनेमे रिलीज होतायत. ब्लॅकमेल आणि मिसिंग. योगायोग असा की दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक मराठी आहेत.गंमत बघा, दिग्दर्शक मराठी, सिनेमे हिंदी आणि शीर्षक इंग्लिश.
ब्लॅकमेलचा दिग्दर्शक आहे अभिनय देव. देल्ली बेल्लीमुळे अभिनय जास्त लोकांपर्यंत पोचला. गेम, फोर्स 2 सिनेमांचं दिग्दर्शनही त्यानं केलं. त्याची 24 ही सीरियल तर खूपच गाजली होती.
ब्लॅकमेल सिनेमा आहे ब्लॅक काॅमेडी. सिनेमात एक मध्यवयीन पुरुष आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यस्त असणाऱ्या या व्यक्तीला अचानक एक दिवस कळतं की आपल्या बायकोचं अफेअर आहे.इरफान खान आणि कीर्ती कुल्हारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तर 'मिसिंग' हा मराठी दिग्दर्शक मुकुल अभ्यंकरचा पहिला सिनेमा. मुकुलनं जर्मनीत पाच वर्ष एडिटिंग आणि साऊण्डचं शिक्षण घेतलं. झी, सोनी, स्टार प्लस, बीबीसी चॅनेल 4साठी त्यानं बरंच काम केलंय. त्याचे तीन सिनेमे बनवून तयारही आहेत. मिसिंगमुळे बाॅलिवूडला नव्या दिग्दर्शकाची ओळख होईल.
मिसिंगमधून तब्बू आणि मनोज वाजपेयी यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा खुलणार आहे. हा सिनेमा एक सायको थ्रिलर आहे. दुबे नावाचं एक जोडपं आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह बाहेरगावी पर्यटनाला जातं. त्यावेळी त्यांची ही मुलगी हरवते आणि मग सुरू होतो शोध. तो करण्यासाठी हाजीर होतो अन्नू कपूर.
त्यामुळे या शुक्रवारी बाॅक्स आॅफिसवर बऱ्याच रहस्यांची उकल होणार एवढं नक्की.