मुंबई 22 मे: रजित कपूर हे बॉलिवूडमधील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जातात. अभिनय, दिग्दर्शन, आणि निर्मिती या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या दमदार कर्तृत्वाची छाप सोडली आहे. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, गोविंदा यांसारख्या ग्लॅमराईज अभिनेत्यांच्या गर्दीत त्यांनी सामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करुन बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. आज रजित कपूर यांचा वाढदिवस आहे. 61 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा प्रवास.
रजित कपूर यांचा जन्म 1960 साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. शाळेत असतानाच त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला कुटुंबीयांनी त्यांना विरोध केला. परंतु त्यांचा दृढ निश्चय पाहून अखेर विरोध मावळला. रजित यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि दूरदर्शनवरील मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.
बापरे! 18 मिनिटं मधमाश्यांना अंगावर घेऊन शूट पूर्ण केलं; अभिनेत्रीचा Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
1986 साली घर जमाई या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर युगंधर, जुनून, रिश्ते यांसारख्या काही मालिकांमध्ये ते झळकले. याच दरम्यान सुरज का सातवा घोडा, लिमिडेट मुन्शी, गुलाम, हरी-भरी यांसारख्या काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं. परंतु रजित कपूर यांना खरी ओळख मिळाली ती ब्योमकेश बक्क्षी या डिटेक्टिव्ह मालिकेमुळं. दूरदर्शनवरील ही मालिका तुफान गाजली. या मालिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. लॉकडाउनच्या निमित्तानं ही मालिका पुन्हा एकदा दुरदर्शनवर प्रसारित करण्यात आली अन् लक्षवेधी बाब म्हणजे तेव्हा देखील प्रेक्षकांनी या मालिकेला तसाच प्रतिसाद दिला. त्यानंतर द मेकिंग ऑफ द महात्मा चित्रपटात त्यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारुन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. या चित्रपटासाठी जगभरातील समिक्षकांनी त्यांचं कौतुक केलं होतं. शिवाय राष्ट्रीय पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित केलं गेलं. अशा या अष्टपैलू कलाकारावर आज वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.