Home /News /entertainment /

व्हायचं होतं डिटेक्टिव्ह झाला अभिनेता; त्या एका घटनेमुळं बदललं मुकेश तिवारीचं आयुष्य

व्हायचं होतं डिटेक्टिव्ह झाला अभिनेता; त्या एका घटनेमुळं बदललं मुकेश तिवारीचं आयुष्य

त्या एका घटनेमुळं त्याचं ध्येय एकाएकी बदललं. आज मुकेशचा वाढदिवस आहे. 51व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया काय होता त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट?

    मुंबई 21 मे: मुकेश तिवारी (Mukesh Tiwari) हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. (Bollywood actor) रोमँटिक हिरो, क्रूर खलनायक इथपासून अगदी विनोदी व्यक्तिरेखांपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका त्यानं आजवर साकारल्या आहेत. मुकेश हा आपल्या युनिक टाईमिंगसाठी प्रसिद्ध आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हे टाईमिंग त्याला शेरलॉक होम्समुळं मिळालं असं तो म्हणतो. त्याच्यावर या काल्पनिक गुप्तहेराचा प्रचंड प्रभाव होता. किंबहूना एक काळ असाही होता जेव्हा त्याला त्याच्याप्रमाणेच गुन्हेगारांचा शोध घेणारा गुप्तहेर व्हायचं होतं. परंतु त्या एका घटनेमुळं त्याचं ध्येय एकाएकी बदललं. आज मुकेशचा वाढदिवस आहे. 51व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया काय होता त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट? मुकेशचा जन्म 1969 साली मध्यप्रदेशमधील एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्याच्या वडिलांना वाचनाची आवड होती. त्यामुळं घरात पुस्तकांचा वावर होता. लहान असताना आर्थर कॉनन यांचं शेरलॉक होम्स हे पुस्तक त्याच्या हाती लागलं. त्यामधील शेरलॉकच्या कथा वाचून प्रेरित झाला. मी देखील एक दिवस असाच लोकप्रिय डिटेक्टिव्ह होईन असं तो म्हणायचा. पुढे शेरलॉकच्या धरतीवरच त्यानं ब्योमकेश बक्क्षी, डिटेक्टिव्ह डी वगैरे प्रकारचे कथासंग्रह वाचून काढले. पण डिटेक्टिव्ह व्हायचं असेल तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी विविध प्रकारची सोंगं घ्यावी लागतात. त्यासाठी अभिनय यायला हवा म्हणून त्यानं अभिनय शिकण्यास सुरुवात केली. अगदी कॉलेजमध्ये गेल्यानंतरही बालपणीचं डिटेक्टिव्ह होण्याचं खूळ काही त्याच्या डोक्यातून गेलेलं नव्हतं. याच दरम्यान त्यानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवला. यामागचा मुख्य उद्देश अभिनय शिकणं असा होता. पण तिथं गेल्यानंतर तो अभिनयाच्या प्रेमातच पडला. त्याच्यामध्ये त्याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा निर्माण झाली. असं म्हणतात तो त्याच्या बॅचमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता होता. अन् या अष्टपैलू अभिनय शैलीच्या जोरावरच त्यानं 1998 साली ‘चायना गेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘रेफ्यूजी’, ‘मिट्टी’, ‘हवा’, ‘जमीन’, ‘हल्ला बोल’, ‘पागलपंती’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. या चित्रपटांमध्ये त्यानं विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अर्थात मुकेशला मुख्य अभिनेता म्हणून फारसं काम मिळालं नसलं तरी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सहाय्यक अभिनेत्यांपैकी एक म्हणून तो ओळखला जातो. कधीकाळी गुप्तहेर होण्याची स्वप्न पाहणाऱ्या मुकेशचं आयुष्य NSD मध्ये पोहोचताच एकाएकी बदललं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment

    पुढील बातम्या