मुंबई, 11 जुलै : गेल्या अनेक वर्षांपासून ऐतिहासिक विषय वा पात्र घेऊन चित्रपटाची निर्मिती करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीने विविध ऐतिहासिक विषयांचे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. आता आणखी एक शूर व पराक्रमी नेतृत्व आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे 'जंगजौहर' या मराठी चित्रपटातून आणखी एक पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अभूतपूर्व पराक्रमाची शौर्यगाथा... 'जंगजौहर',
हे आमचं सिनेमारूपी पुष्प श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन चरणी अर्पण...#जंगजौहर #JungJauhar #AAFilms @almondsCreats @digpalofficial pic.twitter.com/lUttMRmVN2
— kshitee jog (@kshiteejog) July 11, 2020
बाजीप्रभू देशपांडे हे शब्द म्हणजे निस्पृह स्वामीनिष्ठा आणि अजोड पराक्रमाचे प्रतिक. बाजीप्रभू व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे राहिले होते. हजारोंच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रम गाजवित छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड जिवाची पर्वा न करता लढवली. हा पराक्रमाचा पट 'जंगजौहर’ या ऐतिहासिकपटातून रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.
श्री बाजींचे रक्त पेरिलें खिंडीत त्या काळा
म्हणुनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला"