मुंबई, 4 डिसेंबर : टेलिव्हिजन मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) लेखकांपैकी एक असलेल्या अभिषेक मकवानाने (Abhishek Makwana)आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाइड नोटही समोर आली आहे. अभिषेक अनेक वर्षांपासून या मालिकेसाठी लेखक म्हणून काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाइड नोट लिहिली असून त्यात आर्थिक समस्यांचा उल्लेख आहे.
अभिषेकने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. तो सायबर फसवणूकीचा बळी ठरला असून त्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप अभिषेकच्या कुटुंबियांनी केला आहे. मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा आरोप आहे की, त्याच्या मृत्यूनंतर त्याला सतत फोन येत असून, पैशांची मागणी केली जात आहे, अभिषेकने त्यांना लोनसाठी गॅरंटर बनवलं असल्याचंही बोललं जात आहे.
अभिषेक मकवाना 27 नोव्हेंबर रोजी कांदिवलीतील आपल्या घरी मृतावस्थेत आढळला होता. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची केस दाखल केली आहे. याप्रकरणी कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, अभिषेकचा भाऊ जेनिसने, त्याच्या ईमेल्समधून फायनेंशियल फ्रॉडची बाब समोर आल्याचा खुलासा केला आहे. तसंच पोलिसांनीही अभिषेकच्या सुसाइड नोटमध्ये आर्थिक फसवणूकीचा उल्लेख आल्याचं म्हटलं आहे. अनेक दिवसांपासून तो त्रास सहन करत होता, मात्र त्याने सुसाइड नोटमध्ये याबाबत अधिक काहीही लिहिलं नाही.