TANHAJI चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप, प्रदर्शनाआधी वंशजांना दाखवा अशी मागणी

TANHAJI चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप, प्रदर्शनाआधी वंशजांना दाखवा अशी मागणी

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत तान्हाजी या चित्रपटातील आणखी एका दृश्यावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत तान्हाजी या चित्रपटातील आणखी एका दृश्यावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यामध्ये एका दृश्यात तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचं दाखलण्यात आलं आहे. यावर तानाजी मालुसरे यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेत असा उल्लेख इतिहासात कुठेच नाही असं म्हटलं आहे. चित्रपटातील हा भाग वगळण्याची मागणी प्रसाद मालुसरे यांनी एबीपी माझा या टीव्ही चॅनेलशी बोलताना केली आहे.

प्रसाद मालुसरे म्हणाले की, चित्रपटातून मांडला जाणारा इतिहास हा तान्हाजी मालुसरे यांचाच इतिहास म्हणून लोक ओळखतील. ट्रेलरमधील काही ठिकाणी तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधलेलं दाखवलं आहे. इतिहासात आतापर्यंत असं कुठेही वाचलं किंवा ऐकलं नाही त्यामुळे हा प्रसंग चित्रपटातून काढून टाकण्यात यावा. तसेच चित्रपट मालुसरे यांच्या वंशजांनाही दाखवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, तान्हाजी या चित्रपटाविरुद्ध दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्लीस्थित अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघाने याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटलं की, दिग्दर्शकांनी तानाजी मालुसरे यांचे खरे वंशज दाखवलेले नाहीत.

तानाजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी या सिनेमातील काही संवाद आणि दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल. याला धमकी समजली तरी चालेल.’

शिवाजी महाराजांनी जिवाचं रान करुन अवघं स्वराज्य उभं केलं. पण त्यात त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्याच्या निष्ठावान मावळ्यांची. या मावळ्यांपैकीच एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून केवळ 'श्रीं'च्या इच्छेखातर युद्धासाठी सज्ज होणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास या सिनेमात पहायला मिळणार आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट बसलाय. तर सैफ अली खाननं उदयभानच्या रुपातील खलनायक साकारताना कोणतीही कसर सोडलेली नाही.150 कोटी रुपयांच्या बजेट असलेला हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रदर्शित होणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 11:00 PM IST

ताज्या बातम्या