मुंबई, 28 जानेवारी: सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा'
(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेनं घराघरात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यातील जेठालाल, दयाबेनसोबतच
(Dayaben) गोकुलधाम सोसायटीतील प्रत्येक पात्राची विशेष ओळख आहे. दयाबेनचं पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीनं
(Disha Vakani) काही दिवसांपूर्वी या मालिकेतून ब्रेक घेतला. दिशा या मालिकेत कधी परतणार याबाबत चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. हटके अंदाजात ‘हे बा माताजी’ हा दयाबेनचा डॉयलॉग ऐकायला तिचे चाहते आतूर झाले आहेत.
निर्माते दयाबेनला मालिकेत परत आणण्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. दयाबेननं घरवापसी करण्यासाठी काही अवास्तव अटी घातल्याचं पुढे येत आहे. त्याचबरोबर प्रत्येक एपिसोडसाठी आकारण्यात येणाऱ्या फीमध्येही वाढ केल्याचं वृत्त आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या प्रत्येक एपिसोडसाठी दयाबेननं म्हणजेच दिशा वकानीनं तब्बल दीड लाख रुपयांच्या फीची मागणी केल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर शूटच्या दिवशी केवळ 3 तास काम करण्याची अटही दिशानं घातली आहे. याशिवाय शूटिंगच्या सेटवर तिच्या लहान मुलीसाठी नर्सरी आणि मदतनिसाची मागणीही तिनं केली आहे.
दिशाच्या वतीनं तिचे पती मयूर निर्मात्यांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे या सर्व अटी मयूर यांनी घातल्याची चर्चा आहे. त्याला अद्याप दयाबेन किंवा निर्मात्यांकडून दुजोरा मिळालेला नाही. आता दयाबेनच्या नव्या अटी निर्माते मान्य करणार का? की दयाबेनशिवायचं ही मालिका सुरू राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
दिशा वकानीनं 2004 साली 'खिचडी' या मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय दिशानं अनेक गुजराती मालिकांमध्येही काम केलं आहे. मात्र 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील दयाबेनच्या पात्रानं दिशाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.