मुंबई, 29 मार्च : मराठी टेलिव्हिजन असो किंवा चित्रपट, नाटक सगळेच कलाकार तगडी मेहनत करत असतात. अनेक कलाकारांनी गरीबीतून आपलं करिअर घडवलं आहे. तर अनेक कलाकार हे शेतकरी कुटुंबातील आहेत. आजही त्यांच्या गावी शेतीतून उत्पन्न मिळवलं जातं. बरेच कलाकार अभिनय क्षेत्रात असूनही आज शेतात कंबर कसून मेहनत करताना दिसतात. अशीच एक अभिनेत्री आपल्या वडिलांच्या शेतात घामाचं सोन करताना दिसत आहे. ती अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अश्विनी काम करत आहे. पण कामाला थोडासा ब्रेक देऊन अश्विनीनं गाव गाठलं आणि शेताच्या कामांना सुरूवात केली आहे. हे काम करत असताना अश्विनीनं सिस्टमला काही खडे बोल देखील सुनावले आहेत. शेतकऱ्यांच्या मनातील गोष्ट तिनं ओठांवर आणत तिच्या पोस्टमध्ये मांडली आहे.
मार्च, एप्रिल, मे हे महिने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे महिने असतात. वर्षभर ते ज्याची वाट पाहत असतात ते सोन म्हणजेच त्यांच्या कष्टाचं पिक त्यांना मिळणार असतं. अभिनेत्री अश्विनी महांगडे ही शेतकरी कुटुंबातील आहे. अश्विनी मुळची महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील आहे. अभिनयाची आवड आणि कष्ट आज तिला यशाच्या उंचीवर घेऊन आले आहेत. पण अभिनेत्रीची मातीशी जोडलेली नाळ कायम आहे.
हेही वाचा - 'तुझ्या आईला रडायला येतं आहे कारण...'; आई कुठे...' फेम देविकाची लेकीसाठी भावूक पोस्ट
अश्विनीच्या गावी तिच्या वडिलांची काही एकरांची जमीन आहे. तिचे वडील काही महिन्यांपूर्वी वारले. वडिलांचं शेत तिच्यासाठी नेहमीच खास राहिलं आहे. अनेकवेळा तिनं गावच्या शेतातले फोटो शेअर करत तिथल्या आठवणं, अनुभव देखील शेअर केलेत. यावेळी अश्विनीनं शेतात काम करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती ज्वारीच्या पिकांची काढणी करताना दिसतेय. वडिलांचा शर्ट, डोक्यावर कॅप घालून भर उन्हात कष्ट करताना दिसत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ शेअर करत अश्विनीनं लिहिलंय, "रात दिस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी, पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी. जगाचा पोशिंदा : बळीराजा. कोणताच राजकारणी किंवा सिस्टम शेतकर्याला जगवत नसते तर शेतकरीच या सर्वांना जगवत असतो आणि हेच ऊन, वारा पावसासारखे शाश्वत सत्य आहे. ईडा पिडा टळूदे आणि बळीचे राज्य येऊदे. ".
अश्विनीनं पुढे लिहिलंय, "मी घातलेला शर्ट माझ्या वडीलांचा (नानांचा) आहे. नानांची मायेची ऊब, आम्हा सगळ्यांचे उन, वारा, पाऊस, आलेली संकटं यापासून कायम रक्षण केले त्याची जाणीव मनात कायम आहे".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.