मुंबई, 30 मार्च : शाहरुख खानच्या स्वदेश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी गायत्री जोशी तुम्हाला आठवत असेलच. गायत्रीचा जन्म 1977 मध्ये 20 मार्च रोजी नागपुरात झाला. गायत्रीने पहिल्याच चित्रपटात आपल्या निरागस चेहरा आणि निखळ हास्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. पण त्या चित्रपटानंतर ती कुठेच दिसली नाही. स्वदेस हा गायत्रीचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. गायत्री जोशीने शाहरुख सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर वर्षभरातच इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय का घेतला ते आज जाणून घेऊया.
गायत्रीने 1999 मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. ती टॉप 5 मध्येही पोहोचली होती. 2000 मध्ये गायत्रीने जपानमध्ये मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर गायत्री जोशी जगजीत सिंग यांच्या 'वो कागज की किश्ती' या गाण्यात तसेच हंस राज हंस यांच्या 'झांझरिया' या गाण्यात दिसली. गायत्रीने अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीही केल्या होत्या. 2004 साली प्रदर्शित झालेल्या स्वदेस या चित्रपटात शाहरुख सोबत काम करत ती लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला, अशातच गायत्रीला पुढे काम मिळू शकले नाही. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले होते, तसेच ती लवकरच पुढच्या चित्रपटात दिसणार असल्याची आशाही प्रेक्षकांना होती. पण तिने एका वर्षातच इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
शाहरुख खानची पहिली हिरॉईन आहे 'ही' मराठमोळी अभिनेत्री; रिअल लाईफमध्ये खलनायकाशी बांधली लग्नगाठ
2019 मध्ये एका मुलाखतीत गायत्रीने फिल्म इंडस्ट्री सोडण्याबाबत खुलासा केला होता. ती म्हणाली होती, 'मी खूप मोकळ्या मनाची आहे आणि स्क्रिप्ट्स ऐकून मला आनंद होतो. मला खात्री होती की मला येणाऱ्या काळात काही चांगल्या संधी मिळतील. मला अशा भूमिका करायच्या होत्या ज्या माझ्याशी निगडीत असतील. मला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता त्यामुळे लोकांना माझे काम आवडलं होतं याचा मला आनंद होता. पण काही वेळा तुमच्या नियोजनानुसार गोष्टी होत नाहीत.'
स्वदेशच्या रिलीजच्या एका वर्षानंतर 2005 मध्ये गायत्री जोशीने उद्योगपती विकास ओबेरॉयशी लग्न केले आणि चित्रपट जगताचा कायमचा निरोप घेतला. याविषयी बोलताना गायत्री जोशी म्हणाली होती कि, 'मी माझे पती विकास ओबेरॉय यांना भेटले आणि त्याच वेळी मी माझ्या करिअरवर खूश होते पण मला असे वाटले की मी चित्रपटांपेक्षा अधिक करू शकते. लग्नानंतर मी चित्रपट करू शकले असते पण माझ्या कुटुंबाला मला वेळ द्यायचा असल्याने मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.'
गायत्री जोशी आणि विकास ओबेरॉय यांना विहान आणि युवा ही दोन मुले आहेत. पहिला मुलगा 2006 मध्ये आणि दुसरा मुलगा 2010 मध्ये झाला. गायत्री जोशी सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नाही. तिचे पती विकास ओबेरॉय यांना रिअल इस्टेट टायकून म्हणूनही ओळखले जाते. ते मुंबईत रिअल इस्टेट फर्म चालवतात. गायत्री आता ओबेरॉय इंडस्ट्रीजचा व्यवसायही सांभाळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायत्री जोशी यांचे पती विकास ओबेरॉय यांच्याकडे अनेक हजार कोटींची संपत्ती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.