मुंबई, 22 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. वांद्रे पोलिसांकडून हा तपास सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी सुशांतच्या जवळच्या व्यक्तींसह काही सेलिब्रिटींचीही चौकशी केली आहे आणि सुशांतच्या आत्महत्येला बॉलीवूडमधील नेपोटिझम (Nepotism) जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतलाही (Kangana Ranaut) पोलीस चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र कंगनाला मुंबई पोलिसांकडून अद्याप अशी अधिकृत नोटीस आली नसल्याचं कंगनाच्या टीमने सांगितलं.
कंगनाला कोणतीही अधिकृत नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली नाही. कंगनाची बहीण रंगोलीला गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांचा फोन येतो आहे. कंगनाला आपला जबाब नोंदवायचा आहे. मात्र आम्हाला मुंबई पोलिसांकडून काहीही प्रतिक्रिया मिळत नाही आहे. असं ट्विट कंगनाच्या टीमने केलं आहे.
There is no formal summon sent to Kangana , Rangoli keeps getting casual calls from the cops for past 2 weeks, Kangana wants to record statement but we don’t get any response from @mumbaipolice, Here’s a screen shot of message Rangoli ji sent to @mumbaipolicepic.twitter.com/w03i2csbWV
कंगनाच्या टीमने रंगोली आणि मुंबई पोलिसांच्या व्हॉट्स अप मेसेजचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये कंगना चौकशीसाठी तयार असून तिला चौकशीसाठी कधी बोलवणार याबाबत रंगोली वारंवार मुंबई पोलिसांना विचारत आहे. शिवाय शक्य ते सहकार्य मुंबई पोलिसांना करू असंही रंगोलीने म्हटलं आहे.
कंगना रणौतने नेपोटिझमचा मुद्दा उचलून धरत बॉलिवूडमधील अनेकांना लक्ष्य केले होते. तिने व्हिडीओ जारी करून तिची याबाबतची मतं मांडली होती. दरम्यान यानंतर तिला अनेक चाहत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
14 जूनला सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्र्यात आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी सध्या मुंबई पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही होऊ लागली. अभिनेता शेखर सुमन, भाजप नेत्या रूपा गांगुली, डॉ. सुब्रमण्यम स्वामी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मात्र मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालला आहे. या प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.