मुंबई, 12 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा (Sushant Singh Rajput Suicide) तपास आता सीबीआय करत आहे. या प्रकरणातील आर्थिक अँगलच्या दृष्टीने अंमलबजावणी संचलनालय (ED) चौकशी करत आहे. यावेळी त्याच्या ऑक्टोबर 2019 मधील युरोप ट्रिपचा मुद्दा वारंवार समोर येत होता. गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) बरोबर सुशांत या टूरसाठी गेला होता. युरोप टूरसंदर्भात देखील रियाने ईडीसमोर तिचा जबाब नोंदवला आहे. रियाने त्यावेळी नेमके काय घडले याबाबत सांगितले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना अशी माहिती दिली आहे की, 'ऑक्टोबर 2019 मध्ये युरोप ट्रिपदरम्यान आम्ही दोघे इटलीमधील फ्लोरेसमध्ये सुट्टीसाठी गेलो होतो. यावेळी आम्ही एका 600 वर्ष जुन्या हेरिटेज हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या हॉटेलमध्ये काही मोठमोठ्या खोल्या होत्या. तर भींतींवर जुनी चित्रं होती.' रियाने दिलेल्या माहितीनुसार, भींतींवरील एक पेंटिंग पाहून सुशांतने अचानक रुद्राक्षांच्या माळेचा जप सुरू केला. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती खराब झाली. कालांतराने ही परिस्थिती आणखी बिघडू लागली. अहवालानुसार एक वेळ अशी आली की, सुशांतला सांभाळणे रियाला कठीण होऊ लागले. काही वेळाने रियाला देखील सायकायट्रिस्टची गरज भासू लागली. अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
(हे वाचा-रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर तब्बल 3 तास झाली सुनावणी, SC ने राखून ठेवला निर्णय)
सूत्रांच्या या माहितीनुसार रियाने तिच्या जबाबात असे म्हटले आहे की 'मी माझा भाऊ शौविकबरोबर दुसऱ्या खोलीमध्ये होते. पण जेव्हा मी परतले तेव्हा पाहिले की सुशांत एका हातात रुद्राक्ष घेऊन होता आणि काही मंत्रपठण करत होता. तो खूप घाबरला होता. जेव्हा मी त्याला काय झाले विचारले तेव्हा तो म्हणाला की तो भींतीवरील चित्रामध्ये लपलेल्या कॅरेक्टरला बघत आहे. तो स्पष्टपणे त्याच्याशी काही बातचीत करत होता.'
सुशांत त्यावेळी खूप घामाघूम झाला असल्याचेही रिया म्हणाली. तिने आपल्या जबाबात असे म्हटले आहे की, 'यानंतर मी आणि माझा भाऊ खूप घाबरलो. आम्ही त्याला खोलीतून बाहेर घेऊन गेलो. जेव्हा तो नॉर्मल झाला तेव्हा आम्ही त्याला काय झाले विचारले. सुशांत केवळ एवढच म्हणाला की ते आश्चर्यकारक होतं.'
(हे वाचा-'सुशांतच्या आयुष्यातील मोठे निर्णय रिया घ्यायची', श्रुती मोदीचा ED समोर खुलासा)
रियाने ईडीच्या अधिकाऱ्यांना अशी माहिती दिली की, 'ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो तिथे एक पुरातत्व चित्रकार फंसीसीको गोया यांचे एक चित्र लटकवले होते. या चित्रामध्ये एक राक्षस एका मुलाला खात होता, काही असेच दाखवले होते. हे चित्र Saturn Devouring His Son चे होते. हेच चित्र पाहून सुशांत घाबरला. सुशांत वारंवार हेच बोलत होता की या चित्रामध्ये भूत आहे जे की त्याला खाणार आहे. त्यादिवशी त्या खोलीत शौविक त्याच्याबरोबच झोपला. त्या चित्राबाबत सुशांत वारंवार बोलत होता. मी त्याला सांभाळले आणि सांगितले की हा केवळ भ्रम आहे. त्याच्या पुढच्या दिवशी आम्ही तिघे ऑस्ट्रियामध्ये डिटॉक्स सेंटरसाठी निघालो. मात्र सुशांतला तिथेही चांगले वाटत नव्हते. 2 नोव्हेंबरला यूरोप ट्रिप संपणार होती, पण आम्ही 28 ऑक्टोबर 2019 लाच परतलो.'
(हे वाचा-स्वरा भास्करने दिला रिया चक्रवर्तीला पाठिंबा, अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर)
रियाने या जबाबात अशी माहिती दिली की, 'वांद्रे याठिकाणी परतल्यानंतर सुशांत त्याच्या खोलीत एकटा राहू लागला. आतून ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येत असत आणि हे काही दिवस चालले. मग आम्ही त्याला मानसिक रोगांवर इलाज करणाऱ्या डॉक्टरांना दाखवायचा निर्णय घेतला. पण सुशांत कोणत्याच डॉक्टरबरोबर कंफर्टेबल होत नव्हता, त्यामुळे एकामागोमाग एक डॉक्टर आम्ही बदलत होतो.' रियाने अशी माहिती दिली की, यानंतर ती स्वत: नैराश्यात गेली होती. शेवटी 8 जून रोजी सुशांतने तिला तिच्या घरी जाण्यास सांगितले जेणेकरून ती सावरू शकेल.