मुंबई, 28 जून : सुशांत सिंह राजपूतच्या अशा अचानक एक्झिटमुळे त्याच्या कुटुंबीयांसोबतच त्याच्या चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतनं त्याच्या मुंबईच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या कारणांनी वाद सुरू आहेत. अनेक मोठ्या सेलिब्रेटींवर टीका केली जात असतानाच सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंह यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुशांत आणि अंकिताच्या रिलेशनशिपबद्दल मोठे खुलासे केले आहेत. याशिवाय रिया आणि सुशांतच्या लग्नाबाबत मला काहीच कल्पना नव्हती असंही त्यानं सांगितलं.
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत संदीप म्हणाला, सुशांतच्या अखेरच्या काळात त्याच्यासोबत काही लोकं होती. पण आम्ही दोघंही नेहमी कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होतो. पण मला नाही वाटत जेव्हा व्यक्ती असं काही करायचा विचार करतो तेव्हा कोणाला याबाबत काही सांगतो. रिया आणि सुशांतच्या लग्नाबाबत बोलताना संदीप म्हणाला, मला अशा कोणत्याही लग्नाचं निमंत्रण नव्हतं. त्यामुळे मला याबाबत काहीच माहीत नाही. मला जे माहीत आहे ते म्हणजे एक वेळ अशी होती की, सुशांतला अंकिताशी लग्न करायचं होतं.
संदीप पुढे म्हणाला, माझ्यासाठी सुशांतचं ते शेवटचं नातं होतं आणि मला त्याच आठवणींसोबत राहायचं आहे. केवळ अंकिताच त्याची गर्लफ्रेंड होती आणि त्याच्या आयुष्यातली आईची जागा घेतली होती. ती एका आईप्रमाणे त्याची काळजी घेत असे. मी इंडस्ट्रीमधील 20 वर्षांच्या काळात अंकितासारखी मुलगी पाहिली नाही. तिने सुशांतची जेवढी काळजी घेतली तेवढी कोणीच घेऊ शकत नाही. ती एकमेव व्यक्ती होती जी सुशांतला या सगळ्यातून वाचवू शकली असती.
संदीपनं सांगितलं, अंकिता जे जेवण बनवायची ते सुशांतच्या आवडीचं असायचं. घरातलं इंटिरिअर सुद्धा तिनं सुशांतच्या आवडीप्रमाणे बनवून घेतलं होतं. घरात पुस्तकं सुद्धा तीच यायची जी सुशांतला आवडत असत. अंकिता सर्व आनंद सुशांतच्या आनंदावर अवलंबून असे. मला असं वाटतं की, अंकितासारखी मुलगी प्रत्येक मुलाला मिळो. ती त्याच्यासाठी एवढी इमोशनल होती की, त्याच्यासाठी तिने करिअर पण सोडायला तयार झाली होती. तिला सिनेमांच्या ऑफर मिळाल्या होत्या त्या तिनं स्वीकारल्या नव्हत्या. एवढंच नाही तर ब्रेकअप नंतर सुद्धा ती नेहमी सुशांतच्या यशासाठी प्रार्थना करत होती.