मुंबई, 18 मार्च : अभिनेता सुशांत सिंह राजपूत सध्या त्याच्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकताच त्याचा 'सोनचिडिया' सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई करू शकला. लवकरच सुशांतचा 'दिल बेचारा' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'दिल बेचारा'मध्ये सुशांतसोबत संजना सांघी ही अभिनेत्री झळकणार आहे. संजना या सिनेमामधून बॉलिवूड पदार्पण करत आहे. मात्र सध्या सुशांतबद्दल वेगळीच माहिती समोर येत आहे.
सुशांतनं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर सुशांतचे 7.7 मिलियन फॉलोअर्स असून सुशांतनं अचानकपणे असा निर्णय घेतल्यानं त्याचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. सुशांत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. मात्र त्यानं अशाप्रकारे अचानक पोस्ट डिलिट केल्यानंतर सर्वजण यामागचं कारण शोधत आहेत. मात्र सुशांतनं यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना सुशांतच्या अशा वागण्या मागचं कारण समजू शकलेलं नाही.
इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलिट केल्यावर त्यानं 'मी आता इन्स्टाग्रामवर नाही' असं म्हणत सर्वांना गुडबाय केलं आहे. याअगोदरही एकदा सुशांतनं अशाचप्रकारे सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलिट केल्या होत्या पण काही काळानंतर तो पुन्हा इन्स्टाग्रामवर परतला होता. त्यामुळे आताही कदाचित सुशांतच्या इन्स्टाग्रामवर परतण्याची वाट पाहावी लागणार आहे.