मुंबई 23 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या चौकशीला आता वेग आला आहे. सीबीआयच्या पथकाने रविवारी पुन्हा एकदा सुशांतच्या घरी जात चौकशी केली. त्यानंतर आता सोमवारी (24 ऑगस्ट)ला सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणात संशयाची सुई ही रिया चक्रवर्ती भोवतीच फिरत असल्याने या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक आरोप केले होते. आर्थिक प्रकरणांमध्येही तिचं नावं घेतलं गेलं होतं. त्याच बरोबर तिच्याबद्दल अनेक शंकाही उपस्थित केल्या गेल्या होत्या. तर रियानेही थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत आपली बाजू मांडली होती.
रविवारी पुन्हा एकदा CBIची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. त्यावेळी त्यांच्यासोबत तीन खास माणसं होती. यात सुशांतचा कुक नीरज, हाऊस मॅनेजर दीपेश सावंत आणि त्याचा रुम पार्टनर सिद्धार्थ पिठानी यांचा समावेश आहे. सीबीआय 13 आणि 14 जूनला नेमकं सुशांतच्या घरात काय घडलं याची माहिती घेत आहे. त्यातिघांचीही नंतर सीबीआयने चौकशीही केली होती.
हे तिघेही जण 14 जूनला सुशांतसोबतच होते. त्यामुळे त्यांच्याकडून सीबीआयला महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला परवानगी दिली होती.