मुंबई, 04 ऑगस्ट : 'सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणाची ज्या दिशेनं चौकशी सुरू आहे. त्यातून कुणाला तरी वाचवण्यात येत आहे' असा गंभीर आरोप भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. तसंच,'सुशांतच्या मॅनेजर दिशाचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे' असाही आरोप राणेंनी केला आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार विरुद्ध बिहार सरकार असा सामना रंगला आहे. या वादात आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
'सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एफआय आर दाखल केला नाही. पण बिहारमध्ये दाखल झाला आहे. गेल्या 50 दिवसात आरोपींचा शोध मुंबई पोलिसांनी का लावला नाही' असा सवाल राणेंनी उपस्थितीत केला.
मुंबई पोलिसांवर बोट ठेवणाऱ्या अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले
'सुशांतची मॅनेजर दिशा सलियन होती. तिने आत्महत्या केली. पण या आत्महत्या प्रकरणाचा तपास का झाला नाही. तिचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. तिने आत्महत्या केली नसून तिची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगात जखमा आहे, त्यावरून तिचा बलात्कार झाला आहे, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
'8 तारखेला पंचोलीच्या घरी पार्टी झाली होती. या पार्टीला कोण कोण होतं, त्यांची नाव का समोर आली नाही. त्यांना अटक का झाली नाही?' असे सवाल राणेंनी उपस्थितीत केले.
'सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. त्यानंतर घरातील नोकरा दोन तासाने कळलं की, त्याने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर ठराविक रुग्णवाहिका का बोलावली? ठराविक हॉस्पिटलला का नेण्यात आले होते' असंही राणेंनी विचारलं.
दिनू मोरया कोण आहे? त्याच्या घरी अनेक मंत्री का जातात. त्याच्या घरी मंत्री आणि सुशांतची भेट झाली होती आणि तिथून ते पार्टीला गेले होते. ते मंत्री कोण आहे? अधिकारी त्यांना वाचवायचा प्रयत्न का करत आहे.' असंही राणे म्हणाले.
सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती पार्टी का सोडून गेली होती. सुशांतला धमकी दिली जात होती. हे मुंबई पोलिसांना माहिती नाही का? निष्पाप मुलींचा खून करण्याचे राज्य सरकारला लायसन्स दिले नाही' अशी टीकाही राणेंनी केली.
'गुन्हेगारांना वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे राज्य हे 10 वर्ष मागे गेले आहे', अशी टीकाही राणेंनी केली.
एवढंच नाहीतर नारायण राणे यांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टमेचा रिपोर्ट आपल्याकडे असल्याचा दावा केला असून तो मुंबई पोलीस आयुक्तांकडे देणार असल्याचंही राणेंनी सांगितले.