सुशांत प्रकरणी SC च्या निर्णयानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया; मुंबई पोलिसांबाबतही केलं भाष्य
सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात सीबीआय (CBI) चौकशीचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांबाबत मत नोंदवलं, आता बिहार सरकारनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पाटणा, 19 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singj rajput) मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा सर्वात मोठा निर्णय दिला. दरम्यान सर्वोच्च न्यायलयाने मुंबई पोलिसांनाही दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांचं काहीही चुकलं नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. यानंतर आता बिहार सरकारने (Bihar government) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( Bihar CM Nitish kumar) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांंनी मुंबई पोलिसांबाबतही भाष्य केलं आहे. नितीश कुमार म्हणाले, "सुशांत प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची चौकशी करणं ही बिहार पोलिसांची जबाबदारी होती, मात्र त्यांना मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळालं नाही. आमच्या आयपीएस अधिकाऱ्याला कशी वागणूक दिली हे सर्वांना माहिती आहे. जे काही झालं ते योग्य नव्हतं, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातूनही स्पष्ट होतं आहे. या परिस्थितीवर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही"
It was duty of Bihar Police to probe after complaint, but they didn't get cooperation in Mumbai. Behaviour meted out to our IPS officer is known to all. With SC verdict, it's clear what happened wasn't right. Any political comment in this situation isn't right: Bihar CM to ANI https://t.co/vwwlKofJkZ
"बिहार पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर आणि केलेला तपास योग्यच आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट होतं. फक्त सुशांत सिंह राजपूतचं कुटुंब किंवा बिहारचे नागरिकच नाही तर संपूर्ण देशाला या प्रकरणात न्याय हवा आहे. सीबीआय चौकशीमुळे हा मिळेल असा विश्वास सर्वांना आहे", असंही नितीश कुमार म्हणाले.
मुंबईमध्ये बिहार पोलिसांच्या पथकात अडथळा निर्माण करण्यात आला यामुळे संशय वाढला, हे टाळता आले असतं. असं सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना म्हटलं. मुंबई पोलिसांनी मर्यादित चौकशी केली. त्यांनी नोंदवलेली कलमे, अनैसर्गिक मृत्यूची नोंद याची निश्चितता सांगता येत नाही. अनैसर्गिक मृत्यूचे इतर पैलू शोधण्यासाठी सीबीआयकडे एफआयआर नोंदवली आहे. तपासाला विश्वासार्हता देण्यासाठी सीबीआय चौकशी करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. त्याचे कुटुंबीय त्याचप्रमाणे चाहत्याकडून ही मागणी वारंवार होत होती. अखेर सर्वाच्च न्यायलयानेदेखील याच दिशेने निर्णय दिला. त्यानंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने देवाचे आभार मानले आणि सत्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल असून सीबीआयवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. तर सत्याचा विजय होतो, अशी प्रतिक्रिया सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने दिली आहे.