मुंबई 11 एप्रिल: रोहीणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) या भारतीय मनोरंजनसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी मराठीसोबत बॉलिवूड आणि त्यापुढे जाऊन हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. 70व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रोहीणी या भारतातील पहिल्या अभिनेत्री आहेत ज्यांनी एका ऑस्कर विजेत्या चित्रपटात काम केलं होतं. यासाठी त्यांना BAFTA या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानिक केलं गेलं होतं.
रोहिणी यांचा जन्म 1955 साली पुण्यात झाला होता. लहानपणापासूच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. रंगभूमीवरील प्रायोगिक नाटकांमध्ये भाग घेऊन त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. नामांकित कलाकारांच्या सानिध्यात त्यांनी अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवले. 1978 साली त्यांनी ‘अरविंद देसाईकी अजिब दास्ता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी चक्र, अर्थ, पार्टी, सुर्या, प्रेमाची गोष्ट यांसारख्या अनेक हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. सोबतच त्या मराठी मालिका आणि रंगभूमीवरील नाटकांमध्येही काम करत होत्या. लक्षवेधी बाब म्हणजे आपल्या व्यस्त वेळापत्रकांतून वेळ काढत त्यांनी तब्बल 150 नाटकांमध्ये काम केलं आहे. कित्येक नाटकांसाठी त्यांनी मानधनही घेतलेलं नाही.
अवश्य पाहा - सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ
रोहिणी यांच्या करिअरमध्ये खरा ट्विस्ट आला तो ‘गांधी’ या चित्रपटामुळं. 1982 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांना कस्तुरबा गांधी ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. खरं तर हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता. संपूर्ण कथानकाचं क्रेंद्रबिंदू गांधी होते. परंतु तरी देखील रोहिणी यांनी आपल्या जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर विदेशी प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेतलं. एका हॉलिवूड चित्रपटात काम करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या अभिनेत्री होत्या. अन् या चित्रपटात केलेल्या अभिनयासाठी त्यांना BAFTA या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानिक केलं गेलं. विशेष म्हणजे या चित्रपटानं ऑस्कर पुरस्कारावरही नाव कोरलं होतं. आज हा जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. विदेशी चित्रपटात एका भारतीय अभिनेत्रीनं महत्वाची भूमिका साकारली त्यामुळं रोहिणी यांचं प्रचंड कौतुक केलं गेलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Movie release, Oscar award