मुंबई, 21 सप्टेंबर : झी मराठीवर नवीनच सुरू झालेली 'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांच्याच पसंतीस पडत आहे. झी मराठीवर सर्वाधिक ‘टीआरपी’ मिळवणाऱ्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रम सरंजामेच्या भूमिकेतून सुबोधने चक्क २ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.
सुबोध भावेला या मालिकेच्या प्रेक्षकांचे सतत मेसेज, फोन येत असतात. तो म्हणतो, 'या मालिकेचा विषयही प्रेक्षकांना वेगळा वाटतो आहे. वयाने मोठा असलेला विक्रांत आणि त्याच्यापेक्षा निम्म्या वयाची इशा यांची ही प्रेमकथा लोकांना किती पचेल अशी शंका होती. मात्र सध्या मालिकेला जो प्रतिसाद मिळतोय तो पाहता आपल्या समाजातही बदल स्वीकारले जात आहेत. आजपर्यंत ज्या प्रथा आणि समज प्रचलित होते आपल्या समाजात ते गळून पडले आहेत. याचे श्रेय हे नव्या पिढीचे असून ही नवी पिढी अधिक स्वतंत्र आणि नव्या विचारांची आहे यात दुमत नाही.'
आजची पिढी आणि नातेसंबंध याबद्दल सुबोध सांगतो, 'या पिढीच्या अगदी नातेसंबंधाच्या व्याख्याही बदललेल्या आहेत. मी जेव्हा गायत्री म्हणजेच ईशा आणि त्या वयाच्या इतर मुलांना सांगतो की लग्नाआधी मी आणि माझी पत्नी दहा वर्ष एकमेकांच्या प्रेमात होतो. ते ऐकल्यावर आता नाही हे शक्य, असा त्यांचा सूर असतो. त्यांचे नातेसंबंधाबद्दलचे विचारही आता बदलले आहेत. मला वाटतं बदल तेव्हाच होतात जेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो. जोपर्यंत आपण बदल स्वीकारत नाही तोपर्यंत आपण त्याविरोधात टक्कर देत राहतो.'
सुबोधचा मालिकेतला लूक वेगळा आहे. तो म्हणतो, ' ‘लुक’ सांभाळणं ही तशी सोपी गोष्ट नाही. ‘विक्रांत सरंजामे’च्या भूमिकेसाठी थोडे राखाडी केस ठेवले आहेत त्यावरही दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींना तसे केस आवडले तर काहीजण तसे पांढरे केस ठेवल्याबद्दल तक्रार करत आहेत. पण त्यात काय लपवायचंय? जे आहे ते आहे. दाढी तशीच्या तशी ठेवणं जरा अवघड जातं. पण मी हे सगळंच पहिल्यांदा करतोय.'
तो पुढे सांगतो, 'त्यामुळे मी सध्या फक्त मालिका करतो आहे, दुसरं कोणतंही काम हातात घेतलेलं नाही. जे काही चित्रपट केले आहेत त्याच्या प्रसिद्धीत गुंतलो आहे. आता या मालिकेच्या निमित्ताने ‘विक्रम सरंजामे’ कसा वागेल?, कसा उभा राहील?, कसा बोलेल? लोकांपुढे कसा येईल? डोळ्यांतून कसा व्यक्त होईल?, या सगळ्याचा विचार करून ही व्यक्तिरेखा साकारायला मजा येत आहे.'
Birthday Special : सैफच्या आधी करिना 'या' खानवर झाली होती फिदा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा