सुबोधचा लाल्या एकदम 'कड्डक', खणखणीत नाणं रंगभूमीवर

सुबोधचा लाल्या एकदम 'कड्डक', खणखणीत नाणं रंगभूमीवर

नाटक करायचं ही सुबोधनं स्वत:शीच केलेली कमिटमेंट होती. त्याच वेळी प्रतिमा कुलकर्णी नाटक दिग्दर्शित करणार असं ठरलं होतं. नाटकाच्या निमित्तानं सुबोध आणि प्रतिमाताईंशी केलेली ही बातचीत

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : काही दिवसांपूर्वी सुबोध भावेच्या फेसबुक पेजवर काशिनाथ घाणेकरांच्या अश्रूंची झाली फुले नाटकाची पोस्ट टाकली होती. तेव्हाच सुबोध हे नाटक करतोय, हे सर्वांना कळलं. खरं तर 'आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर' सिनेमात घाणेकरांच्या अनेक नाटकांचे थोडे थोडे भाग सुबोधनं साकारले होतेच. मग हेच नाटक करायचं कस ठरलं?

सुबोधनं सांगितलं, ' काशिनाथ घाणेकर सिनेमाच्या वेळीच आम्ही अश्रूंची फुले नाटक करणार होतो. जिथे जिथे प्रमोशनला जाणार तिथे नाटकाचे प्रयोग करण्याचा प्लॅन होता. पण वेळेअभावी ते काही जमलं नाही.'

सिनेमात सुबोधनं घाणेकरांचा लाल्या साकारला होता. आता नाटकातून प्रेक्षक त्याच लाल्याची अपेक्षा ठेवणार का? यावर सुबोध म्हणतो, 'घाणेकरांचा लाल्याची थोडी झाक यात दिसेलच. पण मी काही त्यांचं नाटक पाहिलेलं नाही. आणि आता त्यांची नाटकं पाहिलेला प्रेक्षकवर्गही कमीच आहे.'

नाटक करायचं ही सुबोधनं स्वत:शीच केलेली कमिटमेंट होती. त्याच वेळी प्रतिमा कुलकर्णी नाटक दिग्दर्शित करणार असं ठरलं होतं. नाटकाबद्दल बोलताना प्रतिमाताई म्हणाल्या, ' या नाटकातला लाल्या सुबोधचा असेल. काशिनाथ घाणेकरांनी साकारलेला लाल्या सिनेमात उभा करताना सुबोधनं घाणेकरांचा संभाजीही साकारला होता. इथे तो फक्त लाल्या आहे. हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला हवं.'

अश्रूंची झाली फुलेसाठी सुबोध आपलं वजन कमी करतोय. कारण लाल्या बारीक होता. काॅलेजमधला मुलगा होता. सुबोध म्हणतो, ' आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर सिनेमामुळे बराच तरुणवर्ग सिनेमाशी जोडला गेला. तोच या नाटकाशी जोडला जाणार. '

या नाटकाचे 51च प्रयोग का? तर सुबोध म्हणतो, 'प्रयोग कितीही होऊ शकतात. पण मी एका प्रयोगात खूप रमत नाही. त्यामुळे नाटकाचे प्रयोग मर्यादित ठेवलेत.'

प्रतिमाताईंनी हर्बेरियमसाठी सूर्याची पिल्ले हे वसंत कानेटकरांचं नाटक केलं होतं. त्या म्हणतात, ' ते नाटक सोपं होतं. पण या नाटकात खूप सेट्स आहेत. ब्लॅकआऊट्स आहेत. भाषेची गंमत आहे. पहिल्याच सिनमध्ये सगळ्या व्यक्तिरेखा येतात. यात संघर्ष आहे. हरता हरता तो माणूस जिंकतो. खूप आव्हानात्मक नाटक आहे हे. '

प्रतिमाताई म्हणतात, हल्ली नवे विषय फक्त एकांकिकामध्ये दिसतात. नाटकांत कमी आढळतात. त्या पुढे म्हणाल्या, मला सुंदर फ्रेम हवी असते आणि ती अनेकदा जुन्या विषयात मला सापडते.

सुबोध भावेचे पूर्वी शूट झालेले काही सिनेमे आता रिलीज होतायत. पण गेल्या वर्षभरात आपण सिनेमा केला नसल्याचं तो सांगतो. मराठी सिनेमांबद्दल बोलताना सुबोध म्हणाला, ' मी जेव्हा सिनेमाची निर्मिती करतो तेव्हा पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून लहान मुलांचा विचार करतो. मुलं जोडली गेली की सिनेमाशी कुटुंब जोडलं जातं. प्रेक्षकांना सिनेमात शहाणपणा शिकवू नका. कुठल्याही विषयाचा प्रचार करू नका, प्रेक्षकांना विचार करू दे. आणि मराठी सिनेमा म्हणजे दु:खाचा बाजार नाही, हेही लक्षात असू द्या.'

सुबोध भावेचं नाटक बघणं सुबोधच्या फॅन्ससाठी सुखद अनुभव आहे. या नाटकाचा प्रयोग 1 मे रोजी वसंत कानेटकरांच्या गावी नाशिकमध्ये होणार आहे. नाटकात शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप यांच्या भूमिका आहेत.

- सोनाली देशपांडे

VIDEO : भाजपच्या सभेत तुफान राडा, महाजनांसमोर माजी आमदाराला लाथाबुक्क्याने मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 07:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading