'स्त्री'चा दिग्दर्शक करतोय मराठी सिनेमाचा रिमेक

'स्त्री'चा दिग्दर्शक करतोय मराठी सिनेमाचा रिमेक

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘स्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान यांनी ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याची इच्छा जाहीर केली.

  • Share this:

मुंबई, 01 आॅक्टोबर : मराठी सिनेमांनी जगभरातील फिल्ममेकर्सना भुरळ घातली आहे. अॅड. समृद्धी पोरे यांनी २०११ मधे आपला पहिला चित्रपट बनवला ‘मला आई व्हायचंय’. या चित्रपटाचा विषय होता ‘सरोगेशन’ म्हणजेच गर्भ भाडयाने देणे वा घेणे. ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा या विषयावर त्यांनी या चित्रपटाची कहाणी लिहिली, दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आणि निर्मितीही केली. पदार्पणातच त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुध्दा पटकावलं. आज मात्र तब्बल आठ वर्षानंतर याच चित्रपटाचा हिंदीत रिमेक होत आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘स्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान यांनी ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याची इच्छा जाहीर केली. त्यानुसार अॅड. समृद्धी पोरे यांनी त्यांना कायदेशीर हिंदी रिमेकचे राईट दिलेत. यामध्ये हिंदीतल्या आणि हॉलीवूडमधल्या गाजलेल्या नायिका काम करणार आहेत. कहाणीचं लेखन स्वतः समृद्धी पोरे करणार आहेत.

याच चित्रपटाचे तेलगु रिमेक हक्क त्यांनी या आधीच दिले होते. त्यावर ‘वेलकम ओबामा’ हा तेलगू चित्रपट साऊथ मध्ये गाजला आहे. एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिगींनतम श्रीनिवास राव यांनी हा चित्रपट बघितला होता आणि त्यांनी निर्मिती समृद्धी पोरे यांना तेलगू रिमेकसाठी मागणी केली. श्रीनिवास राव यांनी अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. ‘पुष्पक’, कमल हसनचा ‘अप्पुराजा’ इत्यादी हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.

‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलेल्या समृद्धी पोरे या पेशाने वकील आहेत. हायकोर्टात प्रॅक्टीस करत असताना त्यांच्याकडे एक केस आली. प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेल्या या केसचा विषय खूप महत्त्वाचा असून त्यावर चित्रपट होऊ शकतो हे समृद्धी पोरे यांनी जाणलं. त्यानंतर  वकीली करत असतानाच ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन निर्मिती ही केली. समीक्षकांसह प्रेक्षकांनी गौरवलेल्या या चित्रपटाने अनेकांना भुरळ घातली. त्यानतरचा ‘डॉ प्रकाश बाबा आमटे’ या सामाजिक चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळवून दिलेत. आता त्यांचा ‘हेमलकसा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

एखादी चांगली कलाकृती सर्वदूर पोहोचण्यासाठी योगायोग जुळून यावे लागतात. असेच योगायोग ‘मला आई व्हायचंय’ च्या बाबतीत जुळत गेले आणि आता या सिनेमासाठी हिंदीची कवाडं खुली झाली आहेत. या सिनेमाच्या हिंदी रिमेक बनण्याची कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

PHOTOS : नेहा धुपियाचं डोहाळे जेवण थाटामाटात!

First published: October 1, 2018, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading