जड अंतःकरणाने या बॉलिवूड कलाकारांनी वाहिली मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली

जड अंतःकरणाने या बॉलिवूड कलाकारांनी वाहिली मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली

स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं आज १७ मार्च रोजी सायंकाळी निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते.

  • Share this:

मुंबई, १७ मार्च २०१९- स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं आज १७ मार्च रोजी सायंकाळी निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. रक्तदाबाच्या त्रासामुळे ते शनिवारपासून रुग्णालयात भरती होते. पर्रिकरांच्या निधनावर अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार किरण खेर यांनी दुःख व्यक्त केलं. त्यांनी लिहिलं की, ‘जड अंतःकरणाने मी देशातील सर्वात चांगल्या नेत्याला अखेरचा निरोप देत आहे. देशासाठीच्या तुमच्या कार्यासाठी आणि प्रामाणिकपणासाठी तुम्ही नेहमीच लक्षात राहाल.’

याशिवाय संजय दत्तनेही पर्रिकरांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. त्याने लिहिले की, ‘देशातील सर्वोत्कृष्ट नेत्याच्या निधनाचं दुःख आहे. माझ्या प्रार्थना आणि संवेदना त्यांच्या मित्रपरिवारासोबत आहेत.’

याशिवाय ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीही याबद्दल ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं की, ‘गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची बातमी ऐकून मन फार खिन्न झालं. त्यांचे आणि आमचे फार चांगले स्नेहसंबंध होते. त्यांच्या जाण्याने देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे. एक प्रामाणिक माणूस आणि नेता देशाने गमावला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.’

रणदीप हुड्डानेही पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली. त्याने लिहिले की, ‘फार कमी बोलणारे, साधा स्वभाव, स्ट्रेट शूटर, संरक्षण मंत्री, तीनवेळा गोव्याचे मुख्यमंत्री, सत्तेच्या हव्यासापासून कोसो दूर, आयआयटीमध्ये शिकलेले, देशावर नित्सिम प्रेम करणारा एक असा माणूस जो प्रत्येकासाठी प्रेरणादायी होते.’

भाजप खासदार परेश रावल यांनीही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. त्यांनी लिहिले की, ‘मनोहर पर्रिकर साहेबांच्या निधनाने अतिव दुःख झालं. ते फार प्रामाणिक आणि निर्णायक व्यक्ती होते. त्यांच्याशी बोलण्याचं मला भाग्य मिळालं. आम्ही एक रत्न गमावलं आहे. ओम शांती.’

अतिशय प्रामाणिक, साधी राहणी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले पर्रिकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. २०१४ च्या निवडणुकांनंतर मोदींनी त्यांना खास दिल्लीत बोलावून घेतलं होतं. मात्र गोव्याच्या निसर्गात रमणारे पर्रिकर दिल्लीत फारसे रमलेच नाहीत. त्यांनी गोव्यात परत येण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.

First published: March 17, 2019, 11:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading