श्रीदेवी अनंतात विलीन

श्रीदेवी अनंतात विलीन

साश्रू नयनांनी कपूर कुटुंबिय, बाॅलिवूडचे कलाकार आणि चाहत्यांनी आपल्या या लाडक्या 'चांदनी'ला भावपूर्ण निरोप दिला.

  • Share this:

28 फेब्रुवारी : बाॅलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी लाडक्या चांदनीला निरोप देण्यासाठी अवघं बाॅलिवूड लोटलं होतं. तसंच चाहत्यांनीही अलोट गर्दी केली होती.

19 च्या दशकात आपल्या अदाकारीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवी मागील आठवड्यात 24 फेब्रुवारीला जगाचा निरोप घेतला. भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. हा लग्न सोहळा आनंदात पारही पडला. मात्र शनिवारी रात्री श्रीदेवी बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला.

दुबई पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. या प्रक्रियेत तीन दिवस लोटले.  अखेर 72 तासानंतर श्रीदेवी यांचं पार्थिव मंगळवारी रात्री मुंबईत दाखल झालं होतं.

त्यानंतर लोखंडवाला परिसरातील त्यांच्या निवासस्थानी म्हणजे ग्रीन एकर्स याठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. याठिकाणी कपूर कुटुंबींयांचे निकटवर्तीय, बॉलीवूड कलाकार आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अभिनेता सलमान खान, अर्जुन कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, सुष्मिता सेन, राजपाल यादवसह चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार ग्रीन एकर्सकडे वळले होते.

आज सकाळी अंत्यदर्शनासाठी श्रीदेवी यांचं पार्थिव सेलिब्रेशन स्पोटर्स क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला निरोप देण्यासाठी देशभरातून चाहते जमले होते. सलमान खान, आमिर खान, विद्या बालन, ऐश्वर्या, दीपिका पदुकोण, रेखा, विद्या बालन, तब्बू, माधुरी दीक्षित, सुश्मिता सेन यांनी यावेळी अंतिम दर्शन घेतलं.

त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापासून ते विलेपार्ले  हिंदू स्मशानभूमीपर्यंत पांढऱ्या फुलाच्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. तर 'रूप की रानी'ला नववधूच्या पोशाखात सजवलं होतं. श्रीदेवीला पांढरा रंग आवडतो. म्हणून पांढऱ्या फुलांच्या ट्रक सजवण्यात आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं दर्शन घेत निरोप दिला. यावेळी रथात पती बोनी कपूर, जान्हवी, खुशी या मुली सोबत होत्या.

विलेपार्ले हिंदू स्मशानभूमीत संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटांनी पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

साश्रू नयनांनी कपूर कुटुंबिय, बाॅलिवूडचे कलाकार आणि चाहत्यांनी आपल्या या लाडक्या 'चांदनी'ला भावपूर्ण निरोप दिला. श्रीदेवी या अनंतात विलीन झाल्या असल्या तरी आठवणीच्या रुपात त्या नेहमीच चाहत्यांच्या हृदयात राहणार आहेत.

First published: February 28, 2018, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading