मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

…आणि विजयालक्ष्मीची Silk Smita झाली, या बोल्ड अभिनेत्रीने 10 वर्षात केले 500 चित्रपट; वादग्रस्त राहिलं आयुष्य

…आणि विजयालक्ष्मीची Silk Smita झाली, या बोल्ड अभिनेत्रीने 10 वर्षात केले 500 चित्रपट; वादग्रस्त राहिलं आयुष्य

Silk Smitha

Silk Smitha

सेक्स सिंबल’ हे बिरुद चिकटलेली दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता (Silk Smitha) हिचं आयुष्य वादळापेक्षा कमी नव्हतं. तिच्या आयुष्याची अखेरही अशीच वादळी ठरली.

नवी दिल्ली, 9 मार्च: आपल्या बोल्ड (bold) आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे अभिनेत्री सिल्क स्मिताने (Silk Smitha) तमीळ सिनेसृष्टी गाजवली होती. तिच्या बोल्डनेसमुळे ती नेहमी चर्चेत असायची. स्मिताच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास लोक कायम उत्सुक असतात. सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित 'द डर्टी पिक्चर' (The Dirty Picture) या हिंदी चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) दमदार भूमिका साकारली होती. चित्रपटात सिल्कच्या आयुष्यातील सर्व पैलूंचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा चित्रपट रिलीज झाला त्यावेळी सिल्क स्मिता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आज आम्ही तुम्हाला सिल्क स्मिताच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांबद्दल सांगणार आहोत.

स्मिताचं बालपण

सिल्क स्मिताचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्र प्रदेशातील कोवली गावात झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कसं तरी चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिला शाळा सोडावी लागली. वयाच्या 14 वर्षी लग्न झालेलं. सासरी पतीच्या छळामुळे स्मिता चांगलीच त्रासली आणि तिने पतीचे घर सोडलं. आई-वडिलांच्या घरची परिस्थितीही बिकट असल्याने पतीपासून दूर ती चेन्नईला मावशीकडे राहायला आली.

स्मिताची फिल्मी दुनियेत एंट्री

स्मिता चेन्नईला आली पण तिला उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणं भाग होतं. तिच्या मावशीने तिला फिल्मी दुनियेचा रस्ता दाखवला आणि तिने टच-अप आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. मग तिला छोट्याछोट्या भूमिका मिळू लागल्या. असं म्हणतात की, सिल्कचं खरं नाव विजयलक्ष्मी वडलापटला होतं. पण फिल्मी दुनियेत आल्यानंतर हे नाव बदलून स्मिता ठेवलं.

स्मिताचा 'वंदिचक्करम' हा चित्रपट आल्यानंतर त्यात तिने सिल्क नावाच्या बारगर्लची भूमिका केली होती. चित्रपटातील तिचा अभिनय लोकांना इतका आवडला की ती सिल्क स्मिता म्हणून ओळखली जाऊ लागली. या चित्रपटानंतर सिल्क स्मिताने कधी मागे वळून पाहिले नाही. स्मिताने चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका करून लोकांचं लक्ष वेधलं. ती तिच्या सौंदर्य आणि बोल्डनेसमुळे लाखो लोकांच्या मनावर राज्य करू लागली. सिल्क स्मिता ही खूप हजरजबाबी होती, असंदेखील म्हटलं जातं.

सिल्कचा शेवट

सिल्क स्मिताला बालपणापासून खूप संघर्ष करावा लागला. तिचे अनेक संबंध अयशस्वी ठरले. एक वेळ अशी आली जेव्हा तिने चित्रपटांपासून दूर राहण्यास सुरुवात केली. 23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्कचा मृत्यू (silk smitha death) झाला. तिच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा झाल्या. काही म्हणतात तिने आत्महत्या केली, कोणी म्हणतं तिने झोपेच्या गोळ्या घेतल्याने मृत्यू झाला तर काही लोकांचं म्हणणंय की तिने अतिमद्यपान केल्याने मृत्यू झाला. पण स्मिताच्या मृत्यूचं कारण काय होतं, हे अद्याप समोर आलेलं नाही.

First published:

Tags: Entertainment