नवी मुंबई, 07 डिसेंबर: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत 80-90चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री विजयाशांती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजयाशांती (Congress Senior Leader & Actress Vijayshanthi) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करुन घरवापसी केली आहे. काँग्रेसचा हात सोडून विजयाशांती यांनी हाती कमळ घेतल्याने दक्षिणेत भाजपची ताकद अजून वाढणार आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केल्यानंतर विजयाशांती यांनी घरवापसी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्या खुशबू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच सुपरस्टार रजनीकांतही राजकारणात सक्रीय होण्याच्या विचारात आहेत. विजयाशांती यांनी राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं ते भाजपच्याच साथीने. त्यानंतर त्या टीआरएस (TRS)मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर 2014 साली विजयाशांती यांनी काँग्रेसचा हात धरला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्या नाराज होत्या.
दाक्षिणात्य चित्रपटातील लेडी अमिताभ
विजयाशांती यांचा जन्म 24 जून 1966 मध्ये तामिळनाडूतील चेन्नई येथे झाला होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फिल्मी लाइनमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. कल्लुकुल एरम हा त्यांचा पहिला सिनेमा. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये विजयाशांती यांनी चांगलं नाव कमावलं. लेडी अमिताभ अशी त्यांची ओळख बनली. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषेतील अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केलं.