हैदराबाद, 26 डिसेंबर: बॉलिवूडचा सुपरस्टार सोनू सूद (Sonu Sood) हा अतिशय उत्तम कलाकार आहेच शिवाय माणूस म्हणूनही तो अतिशय साधा आहे. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सोनूने गरीब मजुरांना केलेली मदत सर्वांनाच माहित आहे. अनेकांच्या आयुष्यात तो देवासारखा धावून गेला. लॉकडाऊननंतर बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं सोनू सूदच्या लक्षात आलं. अशा बेरोजगार तरुणांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सोनू सूदने त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ई रिक्षाही दिल्या. सगळं स्टारडम बाजूला ठेवत त्याने आणखी एक भन्नाट काम केलं आहे.
सोनू सूदने हैदराबादमध्ये स्ट्रीट फूडचा आनंद घेतला आहे. तिथे त्याने एग फ्राइड राइस आणि मंचुरिअनवर ताव मारला. तो म्हणाला ‘अनिल नावाच्या एका तरुणाने फास्ट फूडची गाडी सुरू केल्याचं मी सोशल मीडियावर वाचलं होतं. अनेक दिवसांपासून मला त्याच्या हातच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा होता.’ सोनू सूदला आपल्या स्टॉलवर बघून अनिलला धक्काच बसला. अनिल म्हणाला, ‘मला सोनू सूदला बघून आश्चर्याचा धक्काच बसला. मला हा स्टॉल सुरू करण्याची प्रेरणा सोनूकडूनच मिळाली होती. कारण त्याने तरुणांना स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा संदेश दिला होता. त्याने गरीबांना केलेली मदत पाहून मला त्याचा अभिमान वाटतो.’
सिद्धीपेटमध्ये सोनू सूदचं देऊळ बांधण्यात आलं आहे. याबद्दल सोनू म्हणतो, ‘लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. तुमचं हे प्रेम नेहमी असंच मिळत राहू देतं.’ लवकरच सोनू सूद स्वत: एक पुस्तकही लिहीणार आहे.