मुंबई, 18 ऑगस्ट : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद (Sonu sood) अनेकांसाठी देवदूत ठरला. स्थलांतरीत मजुरांपासून सुरू झालेला सोनूचा मदतीचा प्रवास अजूनही सुरूच आहे. कित्येकांना रोजगार, शिक्षण आणि वैदकीय मदत पुरवली. आता त्याने देशातल्या डॉक्टरांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.
आतापर्यंत आपण दत्तक गाव योजना ऐकलं आहे. यामुळे कित्येक गावांचा कायापालट झाला आहे. अशाच पद्धतीने देशातील वैद्यकीय सेवेतही कायापालट होण्यासाठी प्रत्येक डॉक्टरने एका रुग्णाला दत्तक घ्यावं, असं आवाहन अभिनेता सोनू सूदने केला आहे. ज्या दिवशी प्रत्येक डॉक्टर एका रुग्णाला दत्तक घेईल तेव्हा देशाचं चित्र बदलेल असा विश्वास सोनू सूदने व्यक्त केला आहे.
15 ऑगस्टला एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने देशातील वैद्यकीय समस्या, वैद्यकीय परिस्थिती कशी बदलता येईल याबाबत आपलं मत मांडलं.
Proud of you nizam. The day all the doctors pledge to adopt a patient, this country will have a new look❤️ #adoptapatient https://t.co/pMraE8Mea4
— sonu sood (@SonuSood) August 17, 2020
सोनू म्हणाला, "फक्त डॉक्टरच नव्हे तर आपल्यापैकी कुणीही ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि ज्याला शक्य आहे त्याने एका रुग्णाला दत्तक घ्यावं आणि त्याच्या उपचाराचा, औषधांचा,शस्त्रक्रियेचा खर्च उचलावा. यामुळे देशातील अनेक समस्या दूर होतील"
सोनूच्या मदतकार्याने प्रेरित झालेल्या एका वैद्यकीय विद्यार्थ्यानेही आपण डॉक्टर झाल्यानंतर मी दरदिवशी एका रुग्णाला मोफत उपचार देईन अशी प्रतिन्या केली आहे. सोनूने त्याचं कौतुक केलं आहे आणि प्रत्येक डॉक्टरने एक रुग्ण दत्तक घेतल्यास देशाचं चित्र बदलेलं असा विश्वास व्यक्त केला आहे.
हे वाचा - आता पूरग्रस्तांसाठी धावला अक्षय कुमार; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
स्थलांतरीत मजुरांपासून सुरू झालेला सोनूचा मदतीचा प्रवास अजूनही सुरूच आहे. मजुरांना त्यांच्या घरी पोहोवलं, अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला, कित्येकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली आणि आता गरीब आणि गरजूंसाठी वैदकीय मदतीसाठीही आपला हात पुढे केला आहे. इतकंच नव्हे तर देशातील सर्वसामान्यांचे वैद्यकीय प्रश्न कसे सोडवता येतील, हेदेखील त्याने सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sonu Sood