EXCLUSIVE : '...म्हणून सुलोचना दीदी साकारणं अवघड'

EXCLUSIVE : '...म्हणून सुलोचना दीदी साकारणं अवघड'

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा लुक समोर आलाय. सोनाली या सिनेमात सुलोचना दीदींची भूमिका साकारतेय.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर :  आपलं आयुष्य सफल झालं असं वाटण्याच्या काही गोष्टी असतात.. त्यापैकी ही एक.. सुलोचना दीदींची भूमिका. सोनाली कुलकर्णीनं आपल्या इन्स्ट्राग्रामवर ही पोस्ट टाकलीय. आणि सुलोचना दीदींची भूमिका सोनाली साकारतेय, हे समोर आलं.

'आणि काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. या सिनेमातला एकेक लुक समोर येतोय. सुमित राघवनचा श्रीराम लागूंचा लुक सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा लुक समोर आलाय. सोनाली या सिनेमात सुलोचना दीदींची भूमिका साकारतेय.

यानिमित्तानं आम्ही सोनालीशी बातचीत केली. 'सिनेमाचा दिग्दर्शक अभिजीत देशपांडे माझ्याकडे आला, त्यानं मला सिनेमाची गोष्ट ऐकवली. मला ती आवडली. आणि तो म्हणाला, तुला सुलोचना दीदींची भूमिका करायची आहे.' सोनाली सांगते. तिच्यासाठी तो एक सुखद धक्का होता. पुढे सोनाली सांगते, 'मला प्रचंड आनंद तर झालाच, पण खूप टेंशनही आलं. कारण सुलोचना दीदींवर मराठी प्रेक्षकांचं जेवढं प्रेम आहे, तितकंच हिंदी प्रेक्षकांचंही आहे.' पण मूळ लेखिका कांचन घाणेकर आणि दिग्दर्शकानं टाकलेला विश्वास सोनालीसाठी मोलाचा ठरला.

सोनाली कुलकर्णी तर कसलेली अभिनेत्री आहे. तरीही कुठलीही नवी भूमिका प्रचंड अवघड असते, असंही तिनं सांगितलं. 'प्रत्येक वेळी नव्यानं डाव खेळावा लागतो.' सोनाली म्हणते. या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली, 'ज्या गतीनं आपण जातो, म्हणजे आपण अष्टावधानी असतो. एका वेळी असंख्य गोष्टी करत असतो. पण सुलोचना दीदींच्या काळात तर टेलिफोनही लक्झरी होती. त्यांच्यात एक ठहराव होता. त्या वक्तशीर होत्या.' सोनालीला हे सगळं उभं करायचं होतं.

सुलोचना दीदींबद्दल सोनाली आत्मीयतेनं बोलत होती. ती म्हणाली, ' सुलोचना दीदी त्यांच्या कुटुंबासाठी एक मोठा सपोर्ट होत्या. त्यांनी कमावणं ही कुटुंबाची गरज होती. भावनिकदृष्ट्या माणूस रडू शकतो. पण दीदींनी तशी स्वत:ला मुभा दिलीच नव्हती.'

शूटिंगच्या वेळचा अनुभव सोनालीनं सांगितला. ' मी नेहमी सेटवर गेले की कुणीतरी हाक मारतं. आम्ही डबा शेअर करतो. माझ्याकडचे फुटाणे सेटवर मागून घेतात. पण त्या दिवशी मी दीदींच्या गेटअपमध्ये आल्यावर सेटवर माझ्याशी कुणी बोललंच नाही. उलट एका सम्राज्ञीला सगळे जण मान देत होते. आणि तो मला मिळणारा आदर दीदींचा होता. ' सोनाली म्हणाली, ' दीदी एक राॅयल व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्यात डिमाण्ड नव्हती, तर कमाण्ड होती.'

सुलोचना दीदींच्या भूमिकेमागे अनेकांचं योगदान असल्याचं सोनाली सांगते. ' डिझायनर नचिकेत बर्वेनं माझ्यासाठी किती तरी साड्या, ब्लाऊजेस केले. मेकअप आर्टिस्ट श्रीधर परब, हेअर ड्रेसर अनिता यांचीही मदत झाली.

सोनाली अनेक समारंभात सुलोचना दीदींना भेटलीय. आताही भूमिका करण्याआधी त्यांची भेट झाली होती. पण तिनं त्यांना उतारवयातच पाहिलंय. त्यामुळे चिंतनशीलतेनं तिनं ही भूमिका साकारलीय.

सुलोचना दीदींची भूमिका केल्यानंतर सोनालीला काय वाटतंय? 'माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. अनेक अभिनेत्रींना वाटेल, काश मला ही भूमिका मिळाली असती तर?' ती पुढे सांगते, ' मला सुलोचना दीदींचा संयतपणा, सहनशीलता घ्यायला आवडेल. असे आपण कधी नसतो. आपण वाद घालतो. आणि मुख्य म्हणजे समोरच्या माणसाला संपूर्ण अधिकार आपण कधी देतो का? दीदी द्यायच्या. '

बोलता बोलता सोनाली म्हणाली, 'दीदींमध्ये एक दर्दीपणा होता. दाद देण्याची वृत्ती होती. त्या स्वत:च्या आयुष्याचं रडगाणं गाऊ शकल्या असत्या. त्यावर एक पुस्तकही झालं असतं. पण तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी स्वत:च्या आयुष्याला सुंदर बनवलं. हे विलक्षण वाटतं.'

सोनालीनंही भूमिकेला असंच सुंदर बनवलंय. आता प्रतीक्षा आहे ती 'आणि काशिनाथ घाणेकर' रिलीज होण्याची.

Shahrukh - Suhana : बाप-लेकीची जोडी चालली तरी कुठे?

First published: September 11, 2018, 3:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading