मुंबई, 13 मे : बॉलिवूडच्या महत्त्वाच्या कुटुंबापैकी एक असलेलं खान कुटुंब. या खान कुटुंबातून पुन्हा एकदा घटस्फोटाचं वृत्त आलं आहे. या कुटुंबातील दुसऱ्या कपलचा आता घटस्फोट होतो आहे
(Sohail khan Seema Khan divorce). सलीम खान
(Salim khan) यांचा मुलगा अरबाज खाननंतर आता दुसरा मुलगा सोहेल खान यानेही घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोन लग्न करून एकाच छताखली दोन बायकांसोबत इतकी वर्षे सुखाने संसार करणाऱ्या सलीम यांचा मुलांना मात्र त्यांचं एक लग्नही टिकवता आलं नाही. त्यांच्यावर घटस्फोट घेण्यासारखी वेळ का ओढावली असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
सलीम यांना एक मुलगा सलमान खान अविवाहित आहे. दुसरा मुलगा अरबाज खानचा मलायका अरोरासोबत घटस्फोट झाला आहे आणि आता तिसरा मुलगा सोहेल खानही सीमा खानशी घटस्फोट घेतो आहे. या दापम्त्याने मुंबईच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं वृत्त आहे. दोघंही कोर्टाबाहेर दिसले, ज्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लग्नाच्या 24 वर्षांनंतर सोहेल-सीमाचा घटस्फोटाचा निर्णय
सोहेल आणि सीमाची पहिली भेट प्यार किया तो डरना क्याच्या शूटिंगवेळी झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 1998 साली त्यांनी लग्न केलं. त्या दोघांना निरवान आणि योहान ही दोन मुलं आहेत. कधी काळी एकमेकांवर खूप प्रेम करणारे सोहेल-सीमा आता वेगळे का होत आहेत.
हे वाचा - 24 वर्षांच्या संसारानंतर Sohail Khan ला Divorce; Malaika Aroroa नंतर खान कुटुंबापासून वेगळी होणारी Seema Khan आहे तरी कोण?
दरम्यान या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय का झाला याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या कपलने त्याबाबत काहीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ते दोघं बऱ्याच कालावधीपासून एकत्र राहत नव्हते.
2017 सालीही त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती. सीमाने फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइफ (Fabulous Lives of Bollywood Wives) या शोमध्ये काही संकेतही दिले होते. तिने सांगितलं होतं, "सोहेल आणि मी एका साचेबद्ध लग्नात नाहीत पण आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही एक आहोत, आमच्यासाठी, त्याच्या आणि माझ्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी. ती आपल्या स्पेसमध्ये राहते. दोन्ही मुलांचं दोन्ही घरात येणं-जाणं असतं".
लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज-मलायकाने घेतला होता घटस्फोट
सोहेलचा मोठा भाऊ अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा 2017 साली घटस्फोट झाला होता. लग्नाच्या 19 वर्षांनंतर त्यांचं नातं तुटलं. त्यांच्यात नेमकं का झालं हे कळायला मार्गच नव्हता. पण मलायका आणि अर्जुनची मैत्री याला कारणीभूत असल्याचं सांगितलं जात होतं. दोघांनीही आपल्या घटस्फोटाचं नेमकं कारण सांगितलं नाही. पण त्यानंतर मलायका-अर्जुनचं नातं सर्वांसमोर आलं आणि अरबाजही अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीसोबत दिसू लागला. त्यामुळे दोघांनाही आपले नवे जोडीदार मिळाले म्हणून त्यांचा संसार मोडला असं सर्वांनाच वाटलं. मलायका आणि अरबाजला एक मुलगा आहे. ज्याच्यासाठी ते दोघं अनेकदा एकत्र दिसतात. दोघांनी आपली मैत्री कायम ठेवल्याचं दिसतं.
घटस्फोटाशिवाय सलीम खान यांचा दोन बायकांसोबत सुखी संसार
अरबाज आणि सोहेल यांचे वडील सलीम यांनी घटस्फोटाशिवायच दोन लग्न केली आहेत. इतकंच नव्हे तर दोन्ही पत्नींसह ते एकाच ठिकाणी एकत्र राहतात. सलीम खान यांनी 1964 साली हिंदू असलेल्या सुशीला चरक ज्यांचं नाव आता सलमा खान आहे त्यांच्याशी लग्न केलं. त्यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलविरा ही चार मुलं. त्यानंतर सलीम यांनी 1981 साली अभिनेत्री-डान्सर हेलनशी लग्न केलं. त्यांना मूल नाही पण त्यांनी अर्पिताला आपली मुलगी म्हणून दत्तक घेतलं.
हे वाचा - Aashram 3 Trailer: समोर येणार ढोंगी बाबाचं सत्य?बहुचर्चित वेबसीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
घटस्फोटाशिवाय दोन बायकांसोबत एकाच छताखाली सुखी संसार करणाऱ्या सलीम यांच्या मुलांच्या घटस्फोटामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. खान कुटुंबात काही ठिक नाही का? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.