मुंबई, 05 मार्च: टिक टॉक स्टार आणि लावणी क्वीन म्हणून गौतमी पाटील ओळखली जाते. मागच्या वर्षभरात गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गौतमीने महाराष्ट्रभर चांगलीच लोकप्रिय झाली. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ होतो. ती कायमच चर्चेत असते. गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला प्रचंड ट्रोल करण्यात येतं. पण असं असलं तरी तिच्या कार्यक्रमांची गर्दी काही कमी होत नाही. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. पण गौतमी पाटील या क्षेत्रात का आली याविषयी तुम्हाला माहिती नसेल. जागतिक महिलादिनानिमित्त जाणून घेऊन गौतमी पाटीलच्या आजवरच्या प्रवासाविषयी.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे.छोट्या गावातही गौतमी पाटीलच्या डान्सची क्रेझ पाहायला मिळते. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक गौतमीच्या कार्यक्रमाला येतात. तरुण बेभान होऊन नाचतात. गौतमीच्या कार्यक्रमात नेहमी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. काही ठिकाणी पोलीस देखील बोलवावे लागतात. गौतमी पाटील ही लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतो. पण गौतमी या क्षेत्रात घरच्या परिस्थितीमुळे आली. गरीब आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून गौतमी या क्षेत्राकडे वळली.
Gautami Patil Fees: गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते?
गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. ती स्वतःला खान्देशची कन्या असं म्हणते. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला वाऱ्यावर सोडून दिलं. त्यानंतर तिच्या आईच्या वडिलांनी गौतमीचं संगोपन केलं. त्यानंतर आठवीत शिक्षण सोडून गौतमी पुण्यात राहायला आली.
आठवीला असताना गौतमीनं पहिल्यांदा वडिलांना पाहिलं. पुण्यात स्थिरावल्यानंतर वडिलांना परत घरी आणण्याचा प्रयत्न तिने केला. पण दारुचे व्यसन, आईला मारहाण करणे सुरुच राहिल्याने वडिलांपासून पुन्हा दूर ठेवल्याचे ती सांगते. आपले शिक्षण खूपच कमी असल्याचे ती मान्य करते. पण तिचं शिक्षण नेमकं किती झाली याविषयी माहिती नाही.
View this post on Instagram
गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. आणि तिला तिथे पाचशे रुपये मानधन मिळालं होतं. यानंतर गौतमीने या क्षेत्रात भविष्य घडवायचं ठरवलं. आणि इथूनच गौतमीचा खरा प्रवास सुरु झाला.
घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्याकडे वळल्याचे गौतमी सांगते. सुरुवातील ती बॅकडान्सर म्हणून काम करायची. त्यानंतर गौतमीने पुणे आणि कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त शो केले. प्रेक्षकांकडून तिला दिवसेंदिवस अधिक प्रेम मिळू लागलं. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे गौतमी महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.