मुंबई, 25 जून : मनोरंजन क्षेत्रामध्ये आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता एका 16 वर्षीय टिकटॉक स्टारने आत्महत्या करून आयुष्य संपवले आहे. सुप्रसिद्ध टिक-टॉक स्टार सिया कक्कड हिने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सियाचा मॅनेजर अर्जून सरीन याचे तिच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी एक व्हिडीओ अल्बम करण्यासंदर्भात बोलणे झाले होते. 'यावेळी सिया अगदी व्यवस्थित बोलत होती. ती आत्महत्या करेल असं, वाटत नव्हतं. मात्र, त्यानंतर अचानक तिच्या आत्महत्येचं वृत्त समजलं', अशी माहिती अर्जूनने दिली आहे. दरम्यान तिने आत्महत्या का केली असावी याबाबत माहिती समोर आली नाही आहे. फोटोग्राफर विरल भयानी यानं याबाबत एक पोस्ट केली आहे.
दरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे तिने तिच्या इन्स्टाग्रामवर 20 तासापूर्वी म्हणजे बुधवारी एका व्हिडीओची स्टोरी देखील शेअर केली होती. तिचा हा व्हिडीओ आयुष्यातील शेवटचा व्हिडीओ ठरला आहे. यामध्ये ती 'शराबी तेरी ओर' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या 20 तासांमध्ये असं नेमकं काय घडले की तिने आत्महत्येचा निर्णय घेतला, असा सवाल चाहत्यांना पडला आहे.
सियाने हा व्हिडीओ 5 दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रावर देखील शेअर केला होता. त्याबाबतची स्टोरी तिने 20 तासांपूर्वी पोस्ट केली होती.
सियाचे इन्स्टाग्रामवर 98 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षीच तिने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली होती. तिचे काही फॅनपेज देखील बनवण्यात आले आहेत.