मुंबई, 01 फेब्रुवारी : पौष महिना संपला आणि पुन्हा एकदा लग्नसराईला जोरदार सुरूवात झाली आहे. लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन होतं असं म्हणतात. नवरा नवरीला एकत्र आणण्याचा क्षण असतो तो म्हणजे मंगलाष्टका. डोक्यावर अक्षता पडतात, समोर धरलेला अंतरपाट खाली येतो आणि लग्न लागतं. लग्नातील मंगलाष्टका फार खास असतात. अनेक ठिकाणी मंगलाष्टका म्हणणारा वेगळा ग्रुप असतो. आजकाल महिला देखील लग्नात मंगलाष्टका म्हणतात. पण काही काही लग्नात भटजींच्या भसाड्या आवाजातील मंगलाष्टका देखील ऐकाव्या लागतात. पण मराठमोळ्या गायिकेनं लग्नात गायलेल्या मंगलाष्टकांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ती गायिका म्हणजे प्रियांका बर्वे. प्रियांकानं आजवर अनेक शास्त्रीय गाणी, मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत. मात्र तिनं गायलेली मंगलाष्टकानं सगळ्यांचे डोळे पाणावलेत.
गायिका प्रियांका बर्वेच्या नणंदेचं सानिकानं नुकतंच लग्न झालं. लग्नात त्यांनी भटजींच्या मंगलाष्टका न ठेवला स्वत: प्रियांकानं खास मंगलाष्टका गायल्या. तिच्या सुंदर स्वरांनी तिनं लग्नाचा मंडप सुरमयी केला. प्रियांकाच्या सुंदर आवाजातील मंगलाष्टका ऐकून नवरीसह सगळ्यांचे डोळे पाणावले. सगळ्यांसाठी हा भावनिक क्षण होता. जो प्रियांकाच्या सुरेख मंगलाष्टकांनी आणखी सुंदर बनवला.
हेही वाचा - ऐश्वर्या नारकर फिट राहण्यासाठी नेमका कोणता व्यायाम करतात? फिटनेस मंत्रा आला समोर
View this post on Instagram
प्रियांकानं मंगलाष्टकांचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओ शेअर करत तिनं म्हटलंय, 'सानू आणि रुत्विकच्या लग्नासाठी मनापासून गायले. प्रत्येकासाठी हा खरोखर भावनिक क्षण होता. मंगलाष्टकाचा व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी अनेकांनी आग्रह केला. संपूर्ण व्हिडीओ शेअर इथे शेअर करतेय'.
लग्नातील प्रियांकानं गायलेल्या मंगलाष्टका ऐकून अनेकांनी कमेंट करत कौतुक केलंय. एका चाहत्यानं म्हटलंय, 'मंगलाष्टक इतकं छान असू शकतं, हा एक सुखद धक्का ! नाहीतर एरवी गुरूजींच्या भसाड्या आवाजात, कधी एकदा ताराबलं च .... होतंय , याचीच वाट पहायचो आम्ही'. तसंच 'क्या बात हैं', 'खूप छान ताई', 'सुंदर' अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे 'सुदंर मंगलाष्टक गायलात तुम्ही डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आहे', असंही एका चाहत्यानं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.