मुंबई, 01 डिसेंबर: गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा गायक, निवेदक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agrawal) यांचं आज लग्न आहे. दरम्यान, आदित्यच्या लग्नाएवढीच चर्चा त्याचा वेडिंग कार्डची आहे. काही उत्साही नेटीझन्स त्याच्या अनोख्या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ शेअर करत आहेत. आदित्य नारायणच्या विवाहाची ही निमंत्रण पत्रिका अत्यंत आकर्षक आणि आगळीवेगळी आहे.
विवाह सोहळ्याआधी आदित्यने इन्स्टाग्रामवर तिलक समारंभाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये आदित्यने निळ्या रंगाचा सुंदर कुर्ता परिधान केला असून, श्वेता केशरी रंगाच्या साडीत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि हास्य आहे. लग्नाच्या आधीचे विधीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोत श्वेतासह आदित्य नारायण आपले वडील गायक उदित नारायण आणि आई दीपा यांच्यासह दिसत आहे.
आदित्य आणि श्वेता दहा वर्षांहून अधिक काळ रिलेशनशीपमध्ये आहेत. ऑक्टोबरमध्ये आदित्यने सोशल मीडियावर आपल्या विवाहाची खबर दिली होती. श्वेताचा फोटो शेअर करून त्याने, ‘आम्ही विवाह करत आहोत. मी भाग्यवान आहे की, मला श्वेतासारखी साथीदार लाभली. 11 वर्षापूर्वी आम्ही भेटलो आणि आता या डिसेंबरमध्ये आम्ही विवाह करत आहोत. लग्नाच्या तयारीसाठी आम्ही सोशल मीडियावरून काही काळ ब्रेक घेत आहोत. डिसेंबरमध्ये भेटू’, अशी पोस्ट केली होती.
विवाहसोहळ्यानंतर 2 डिसेंबर रोजी भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. आदित्य नारायणने हिंदी चित्रपटात गायक म्हणून लहानपणीच कामाला सुरुवात केली. पार्श्वगायक म्हणून त्याला फार संधी मिळाली नाही. त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलचे सूत्रसंचालन केले असून, या शो दरम्यान गायिका नेहा कक्करबरोबर त्याचे अफेअर असल्याची आणि ते लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
इंडियन आयडॉलच्या एका कार्यक्रमात उदित नारायण आणि त्यांच्या पत्नी दीपा यांनीही हजेरी लावली होती आणि त्यांनी आदित्यचे लग्न नेहाशी करण्याबाबत उल्लेख केला होता. त्यानंतर या दोघांच्या विवाहावरून वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला होता. नंतर मात्र नेहाने गायक रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली. आणि आता आदित्य श्वेताशी लग्न करणार आहे.