बाहुबली स्टार प्रभासच्या (prabhas)बहुप्रतिक्षीत 'सलार' (Salaar) या सिनेमात श्रुतीची वर्णी लागली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या ट्विटरवरुन चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे.
मुंबई 28 जानेवारी : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयानं छाप पाडणारी अभिनेत्री श्रुती हसनचा (Shruti Haasan) आज 35वा वाढदिवस आहे. श्रुती दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन (Kamal Hasan) यांची मुलगी आहे. तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधत होमेबल फिल्मनं एक ट्वीट करत श्रुतीच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. बाहुबली स्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षीत 'सलार' (Salaar) या सिनेमात श्रुतीची वर्णी लागली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या ट्विटरवरुन चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे.
चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये श्रुती हसनचा नवा लुक पाहायला मिळतोय. या पोस्टरसोबत सलारमध्ये आपलं स्वागत आहे, असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. यासोबतच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या गेल्या आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून प्रभास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करायला सज्ज झाला आहे. प्रभास लवकरच केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या सिनेमात झळकणार असल्याची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत होती, आता अखेर याबद्दल अधिकृत घोषणाही झाली आहे.
नुकतंच या सिनेमाबद्दल बोलताना प्रभास म्हणाला होता, की या सिनेमातील माझं पात्र अत्यंत वेगळं आहे. मी याआधी असं पात्र कधीही साकारलं नाही. या सिनेमाचं चित्रीकरण सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. सलारचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनीही सिनेमाबद्दल बोलताना असं म्हटलं होतं, की तुम्ही प्रभासला याआधी अशा भूमिकेत कधीही पाहिलं नसेल. त्यामुळे, प्रभासच्य चाहत्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. तर, चित्रपटातील इतर पात्रांची नावं मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहेत.