मुंबई, 06 मार्च : 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली. यानंतर याच मालिकेतील अभिनेता शीझान खानला अटक करण्यात आली होती. 70 दिवस तुरुंगात काढल्यानंतर अखेर शीझान खान बाहेर आला आहे. तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अभिनेत्रीच्या आईने अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता तब्बल 70 दिवसांनी त्याला जमीन मंजूर झाल्यांनतर अभिनेता तुरुंगाबाहेर आला आहे. तो बाहेर आल्याने आई आणि दोन्ही बहिणी खूप खूश आहेत. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत तुनिषाच्या मृत्यूवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
शीझान खानने 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत, तुरुंगातून बाहेर आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यावेळी तो म्हणाला, 'आज मी स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजू शकलो आहे. मी ते अनुभवू शकतो. आई आणि बहिणींना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. आता त्यांच्या जवळ येऊन, घरी गेल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. शीझान खान म्हणाला, 'शेवटी मी माझ्या कुटुंबासोबत आहे. ही खूप चांगली भावना आहे. मला फक्त काही दिवस आईच्या मांडीवर झोपायचे आहे, तिने बनवलेले अन्न खावे आहे आणि माझ्या बहिणी आणि भावासोबत वेळ घालवायचा आहे.' अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.
तुनिषा शर्माने 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या टीव्ही मालिकेच्या सेटवर शीझानच्या रुममध्येच आत्महत्या केली होती. ही घटना 24 डिसेंबरला घडली आणि 25 डिसेंबरला शीझानला अटक करण्यात आली. या घटनेच्या 15 दिवसांपूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले होते. अशा परिस्थितीत हा अभिनेता संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता.त्याचवेळी अभिनेत्रीच्या आईने शिजानवर आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आरोप करत त्याला अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला कस्टडीत घेतलं होतं. तेव्हापासून अभिनेता शिझान खान तुरुंगात होता. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर अभिनेता तुरुंगातून बाहेर आला आहे.
मुलाखतीत जेव्हा त्याला तुनिषाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'मला तिची आठवण येते आणि ती जिवंत असती तर ती माझ्यासाठी लढली असती.' असं तो म्हणाला आहे.
याच मुलाखतीत शीझानबद्दल बोलताना त्याची बहीण आणि अभिनेत्री फलक नाज म्हणाली कि, 'आम्ही खूप आनंदी आहोत की शीझान परत आला आहे. गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागेल. पण आता शीझान शेवटी बाहेर आला आहे. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमच्या पाठीशी उभे राहिले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.' अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. शीझानला सध्या जमीन मिळाला असला तरी त्याच्याकडून पासपोर्ट घेण्यात आला असून त्याच्यावर काही बंधनं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actor, Tv actress