मुंबई 28 एप्रिल: शर्मन जोशी (Sharman Joshi) हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं आजवर विनोदी, सस्पेन्स, अक्शन, रोमँटिक अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. गेली दोन दशकं तो सिनेसृष्टीत कार्यरत आहे. परंतु त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांच्या थ्री इडियट्स (3 Idiots) या चित्रपटामुळं. या चित्रपटात त्यानं साकारलेली राजू रस्तोगी ही भूमिका प्रचंड गाजली. परंतु तुम्हाला माहित आहे का ही भूमिका त्याला चक्क एका टॉयलेटमध्ये ऑफर करण्यात आली होती. आज शर्मनचा वाढदिवस आहे. या निमित्तानं पाहूया त्याच्या करिअरमधील सर्वाधिक गाजलेल्या व्यक्तिरेखेचा भन्नाट किस्सा.
तो एका दिग्दर्शकाला भेटण्यासाठी गेला होता. परंतु काही कारणास्तव मिटिंग रद्द झाल्यामुळं तो चित्रपट पाहण्यासाठी जवळच्याच एका सिनेमागृहात गेला. तिथं त्याची भेट राजकुमार हिरानी यांच्याशी झाली. ते आपल्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी तिथं आले होते. अर्थात गर्दी असल्यामुळं शर्मनला त्यांच्यासोबत फार काही बोलता आलं नाही. त्यानंतर तो टॉयलेटमध्ये गेला. अन् आश्चर्याची बाब म्हणजे शर्मनला भेटण्यासाठी राजकुमार हिरानी टॉयलेटमध्ये आले. त्यांनी तिथंच आपल्या आगामी चित्रपटात त्यानं काम करावी अशी इच्छा व्यक्त केली. या चित्रपटाचं नाव, पटकथा, कास्टिंग याबद्दल त्यांनी काहीच सांगितलं नाही. तरी देखील शर्मननं त्यांना होकार दिला.
अवश्य पाहा - 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा बोल्ड फोटोशूट; व्हायरल PHOTO नी सोशल मीडियावर धुमाकूळ
ही घटना घडून तीन महिने उलटले होते. तरी देखील राकुमार हिरानी यांच्या चित्रपटाचा पत्ता नव्हता. पण एके दिवशी दुपारी अचानक त्याला फोन आला अन् त्यांनी शर्मनला भेटायला बोलावलं. त्याचं रितसर ऑडिशन घेण्यात आलं. हे ऑडिशन त्यांना आवडलं. परिणामी राजू रस्तोगी ही भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मननं हा भन्नाट किस्सा सांगितला होता. आज थ्री इडियट्स हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांमपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर अमेरिका-युरोपमध्ये देखील तुफान गाजला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment