मुंबई, 5 ऑगस्ट: 'होणार सून मी या घरची' या प्रसिद्ध मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता शंशाक केतकर सोशल मीडियावर सक्रीय असतो. असे फार कमी कलाकार आहेत ज्यांना आपल्या समाजात काय सुरू आहे याच भान असतं. त्यातील एक अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक नेहमीच अनेक विषयांवर व्यक्त होत असतो. त्याच्या पोस्टही चर्चेत असतात. यावेळी शशांक त्याच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. शशांकनं थेट भारत सरकारच्या नव्या 'हर घर तिरंगा' या मोहिमेला विरोध दर्शवला आहे. भली मोठी पोस्ट लिहित शशांकनं त्याचं मत व्यक्त करत अनेक प्रश्न देखील विचारले आहेत. तसंच या मोहिमेला विरोध करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
यंदाचा स्वातंत्र्य दिन हा 75वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशात आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यानुसार हर घर तिरंगा या मोहिमेची जय्यत तयारी देखील सुरू झाली आहे. अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर तिरंग्याचा फोटो देखील ठेवायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा -
Gauri Nalawade: 'विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही म्हणालास...'; अभिनेत्री गौरी नलावडेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन
दरम्यान या मोहिमेचं एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात संपूर्ण देशाचं चित्रण आणि देशातील दिग्गज गायकांच्या आवाजातील एक सुंदर गाणं ऐकायला मिळत आहे.
मोदींनी राबवलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेला अनेकांची सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी याला विरोध दर्शवला आहे. अभिनेता शशांक केतकरनं याला विरोध करत पोस्ट शेअर केली आहे. शशांकनं पोस्टमध्ये म्हटलंय, 'चला चला विरोध करा. सगळ्या बक्कळ पैसे कमावणाऱ्या सेलिब्रेटींना घेऊन केलेल्या गाण्याला विरोध करा . यातून अजिबात इन्सपायर वगैरे तर होऊच नका. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा एक ऊर्जा मिळते वगैरे सगळं खोटं आहे. जुन्या पिढ्यांनी जी आत्ता पर्यंत वाट लावली, तीच देशासाठी योग्य आहे. यंग वेगळा दृष्टिकोन वगैरे काही नसतं'.
शंशांकनं पुढे म्हटलंय, 'भारताचा झेंडा घरो घरी असावा.... ही पॉझिटिव्ह भावना १४० कोटी लोकांच्या मनात रुजावी या साठी आपल्या सरकारला कॅम्पिन करावं लागतं? जगातल्या प्रत्येक देशात काही ना काही प्रोब्लेम्स आहेत, पण जेव्हा जगासमोर मांडलेल्या त्यांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा ते सगळे कट्टर होतात. देशासाठी पेटून उठतात. आपण केव्हा कट्टर भारतीय होणार ? आपण केव्हा आपल्या देशाचा विचार करणार ?', असा सवाल शशांकनं केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.